Mamata Vs CBI : सुप्रीम कोर्टाचा ममता बॅनर्जींना दणका

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजीव कुमार यांना अटक करु नये, असेही सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत. शिवाय, राजीव कुमार यांच्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा मेघालयमधील शिलाँगमधील एखाद्या ठिकाणी त्यांची चौकशी करा, असेही सुप्रीम कोर्टाने …

Mamata Vs CBI : सुप्रीम कोर्टाचा ममता बॅनर्जींना दणका

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजीव कुमार यांना अटक करु नये, असेही सुप्रीम कोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत. शिवाय, राजीव कुमार यांच्या चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशा मेघालयमधील शिलाँगमधील एखाद्या ठिकाणी त्यांची चौकशी करा, असेही सुप्रीम कोर्टाने सीबीआयला सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या विरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात अवमान याचिकाही दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत, सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना नोटीस धाडली आहे. येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

येत्या 20 फेब्रुवारीला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

“सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांच्या विरुद्ध कोणतेही जबरदस्ती केली नाही. त्यामुळे हा आमचा नैतिक विजय आहे. आम्ही न्यायव्यवस्था आणि सर्व संस्थांचा आदर करतो. आम्ही आभारी आहोत.”, अशी पहिली प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दिली. मात्र, तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाबाबत पुढील भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.

सीबीआयच्या याचिका आणि कोर्टात सुनावणी

1. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी शरण यावं आणि चौकशीला सामोरं जावं, अशी पहिली याचिका सीबीआयने दाखल केली होती. – राजीव कुमार यांनी सीबीआयच्या चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश दिलेत.

2. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधात अवमानाची याचिकाही सीबीआयने दाखल केली होती. – सुप्रीम कोर्टाने तिघांनाही नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सीबीआयचे अधिकारी रविवारी (3 फेब्रुवारी) संध्याकाळी रोज व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी तपासाकरीता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलं. एसआयटी टीमचे नेतृत्व करत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कागदपत्र आणि फाईल्स गमावल्याबद्दल तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आयुक्तांच्या घरी पोहोचले होते. याबाबत त्यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र त्याचे काहीही उत्तर आले नाही. त्यानंतर 3 फेब्रुवारीला छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

यानंतर ममता बॅनर्जी थेट पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचल्या. रविवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी सीबीआयने विनापरवानगी धाड टाकल्याने त्याला विरोध म्हणून मोदी सरकारविरोधात धरणं आंदोलन सुरु केलं. कोलकात्यातील मेट्रो स्टेशन इथं ममता बॅनर्जी आंदोलनाला बसल्या.

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला कुणा-कुणाचा पाठिंबा?

ममता बॅनर्जींच्या या आंदोलनाला देशभरातील राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनात उतरले आहेत.

शारदा चिटफंड घोटाळा नेमका काय आहे?

एप्रिल 2013 मध्येच हा घोटाळा उघडकीस आला होता. सुमारे 10 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची शारदा ग्रुपने फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंदाजे 2 हजार 460 कोटींचा शारदा चिटफंड घोटाळा असल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुप या चिटफंड कंपनीने लोकांची फसवणूक केली, त्यासाठी आकर्षित करणाऱ्या ऑफर कंपनीकडून देण्यात आल्या. 15 महिन्यात पैसे दुप्पट मिळतील, यांसारख्या ऑफरचा यात समावेश होता. चार कंपन्यांच्या माध्यमातून अशा ऑफर देण्यात आल्या. मात्र, ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ आली, त्यावेळी या कंपन्यांना टाळे होते.

घोटाळ्याचं टीएमसी कनेक्शन काय आहे?

शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुणाल घोष यांचं नाव समोर आल्यानंतर, या घोटाळ्याला राजकीय वळण लागलं. कुणाल घोष यांनी या घोटाळ्यात तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगला आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. कुणाल घोष यांनीच या घोटाळ्यात टीएमसीच्या इतर बड्या नेत्यांवर आरोप केले आहेत. तसेच, या घोटाळ्याच्या चौकशीवेळी एसआयटीचे अध्यक्ष राजीव कुमार होते. सध्या ते कोलकात्याचे पोलिस आयुक्त आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *