Veg Non Veg Label : शांपू, टुथपेस्टवर लावावे लागणार व्हेज, नॉन व्हेज लेबल, सरकारचा नवा नियम लागू; वाचा तुमचा काय फायदा?
हा नियम आता खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि विविध कॉस्मेटिक उत्पादनांनाही लागू असेल. या चिन्हांच्या आधारे संबंधित प्रोडक्टच्या गुणवत्तेची माहिती देण्यात येणार नाही.

Veg Non Veg Label : एखादा खाद्यपदार्थ व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? हे ओळखण्यासाठी एक नियम पाळला जातो. खाद्यपदार्थ व्हेज असेल तर हिरवा आणि नॉनव्हेज असेल लाल ठिपका अनेक फूड पॅकेटवर पाहायला मिळतो. परंतु आता हा नियम फक्त खाद्यपदार्थांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. आता साबण, शांपू तसेच अन्य सौंदर्यप्रसाधने आणि टॉयलेटरीज व्हेज आहे की नॉनव्हेज हे कंपन्यांना नमूद करावे लागेल. या नव्या नियमाची अधिसूनचा 21 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. दरम्यान, हा नियम नेमका काय आहे? नियमाचे पालन कसे केले जाईल? हे पाहुया…
सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे?
साबण, शांपू, टूथपेस्ट, कॉस्मेटिक्स यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करताना त्या उत्पादनात शाकाहारी किंवा मांसाहारी स्रोतांपासून मिळालेल्या घटकांचा वापर झाला आहे की नाही, हे ग्राहकांना आता सहज समजणार आहे. केंद्र सरकारने पॅकेज्ड कॉस्मेटिक्स आणि संबंधित उत्पादनांच्या लेबलिंगसंदर्भातील नियमांमध्ये बदल केला असून, हे नवे नियम 21 सप्टेंबर 2026 पासून लागू झाले आहेत.
हिरव्या आणि लाल रंगाचे ठिपके दिसतील
नव्या नियमांनुसार, उत्पादनाच्या पॅकेजिंगवर वेज आणि नॉन-वेज घटकांची ओळख करून देण्यासाठी विशिष्ट रंगांचे चिन्ह देणे आवश्यक असेल. शाकाहारी उत्पादनासाठी हिरव्या रंगाचे चिन्ह, तर अंडे किंवा मांसाशी संबंधित घटकांचा वापर असलेल्या उत्पादनासाठी लाल किंवा तपकिरी रंगाचे चिन्ह लावले जाईल.
प्रोडक्टची गुणवत्ता समजणार नाही, फक्त…
हे चिन्ह पॅकेजिंगवरील ठळकपणे दिसेल अशा प्रकारे प्रिंट केले जाईल. हा नियम आता खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि विविध कॉस्मेटिक उत्पादनांनाही लागू असेल. या चिन्हांच्या आधारे संबंधित प्रोडक्टच्या गुणवत्तेची माहिती देण्यात येणार नाही. फक्त संबंधित प्रोडक्टच्या निर्मितीत शाकाहारी किंवा मांसाहारी घटकांचा वापर केलेला आहे, एवढंच यातून समजून येईल. दरम्यान, आता सरकारच्या या निर्णयामुळे सामांन्यांना अनेक अर्थांनी फायदा होणार आहे. जे लोक शाकाहारी आहेत, त्यांना कोणत्या पदार्थात मांसाहारी घटकांचा वापर केलेला आहे, हे समजून येईल.
