सोनम वांगचुक-अभिजीत दिपके जोडी पुन्हा दिसणार? CJP ला पाठिंबा देण्याबाबत वांगचुक यांचं मोठं विधान

Sonam Wangchuk Abhijit Dipke : दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर आता अभिजीत दिपके आणि सोमन वांगचुक पुन्हा आंदोलनात एकत्र दिसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता सोनम वांगचुक यांनी मोठं विधान केलं आहे.

सोनम वांगचुक-अभिजीत दिपके जोडी पुन्हा दिसणार? CJP ला पाठिंबा देण्याबाबत वांगचुक यांचं मोठं विधान
Abhijit Dipke and Sonam Wangchuk
Image Credit source: Google
| Updated on: Aug 28, 2026 | 4:56 PM

कॉकरोच जनता पार्टीने राजधानी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत जंतर-मंतरवर उपोषण केले होते. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील या आंदोलनाला वांगचुक यांच्या उपोषणामुळे वेगळे वळण मिलाले होते. या यशस्वी आंदोलनानंतर आता अभिजीत दिपके आणि सोमन वांगचुक पुन्हा आंदोलनात एकत्र दिसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता सोनम वांगचुक यांनी मोठं विधान केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

चांगल्या मुद्द्यांसाठी माझी गरज भासल्यास…

CJP आंदोलनाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वांगचुक यांनी सांगितले की, ‘चांगल्या मुद्द्यांसाठी माझी गरज भासल्यास भविष्यातही मी समर्थन देण्यास तयार आहे.’ पुढे बोलताना त्यांनी हलक्याफुलक्या अंदाजात स्वतःला ‘ऑनरेरी कॉकरोच’ असल्याचेही म्हटले. मात्र, वय अधिक असल्याने आणि मी आळशी नसल्याने कॉकरोच बनण्याच्या पात्रतेत बसत नसल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोनम वांगचुक यांनी सांगितले की, ‘लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी CJPच्या मागे पाकिस्तान आणि अमेरिका यांसारखे देश असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या पक्षाला समर्थन देऊ नये, असेही मला सांगण्यात आले होते. त्यानंतर मी कॉकरोच जनता पार्टीबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि अभिजीत दीपके यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या पक्षाची भूमिका चुकीची नसल्याचे आणि त्यामागे कोणत्याही परदेशी शक्तीचा हात नसल्याचे आपल्याला जाणवल्याचे वांगचुक यांनी सांगितले. यानंतर त्यांनी CJPच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. तसेच अभिजीत दीपके भारतात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली तर आपण उपोषणाला बसू, अशी घोषणाही त्यांनी केली होती.

CJPला पुढेही समर्थन देणार?

CJP सोबत सरकारशी चर्चा करणार का आणि आगामी आंदोलनांमध्ये त्यांची भूमिका काय असेल, असा प्रश्न सोनम वांगचुक यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चांगल्या मुद्द्यांना आपले समर्थन कायम राहील. देश किंवा जगातील कोणत्याही चांगल्या मुद्द्यासाठी आपण समर्थन देण्यास तयार आहे. लडाखच्या प्रश्नांपासून जंतर-मंतरवरील CJPच्या आंदोलनापर्यंत आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर सहभागी झालो असल्याचे वांगचुक यांनी सांगितले. लडाखमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली आणि सुरक्षेशी संबंधित उपाययोजना लागू झाल्यानंतर कदाचित आपली भूमिका संपेल आणि त्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us