Pulkit Mani: कोण आहे पुलकित मणी? राहुल गांधींसमोर मोदींची नक्कल केल्यामुळे रातोरात व्हायरल

Pulkit Mani: या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस समर्थकांकडून त्यावर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पुलकित मणी आहे तरी कोण, असा सवाल अनेक नेटकरीसुद्धा करत आहेत.

Pulkit Mani: कोण आहे पुलकित मणी? राहुल गांधींसमोर मोदींची नक्कल केल्यामुळे रातोरात व्हायरल
पुलकित मणी, राहुल गांधी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2026 | 2:57 PM

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 19 सप्टेंबरला झालेल्या या कार्यक्रमात पुलकितने मोदी यांच्या बोलण्याच्या शैलीपासून त्यांच्या हावभावांपर्यंत अनेक गोष्टींची नक्कल केली. राहुल गांधी या सादरीकरणादरम्यान मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोदींची नक्कल करणारा पुलकित मणी आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

कोण आहे पुलकित मणी?

पुलकित मणी हा स्टँडअप कॉमेडियन असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांच्या शैलीची मिमिक्री करणाऱ्या कंटेंटसाठी ओळखला जातो. त्याच्या परफॉर्मन्समध्ये राजकीय व्यंग आणि सध्याच्या घडामोडींवर विनोदी भाष्य पाहायला मिळतं. मोदी यांच्या शैलीची मिमिक्री करणारा त्याचा कंटेंट याआधीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

इंदूरमधील कार्यक्रमात त्याने मोदींच्या परदेशी नेत्यांसोबतच्या संवादाची आणि ‘माय फ्रेंड’ या शब्दप्रयोगाची नक्कल केली. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांशी संबंधित शैली, मुलांसोबत संवाद साधतानाची त्यांची देहबोली आणि नाण्याची ट्रिक यांचाही त्याने विनोदी पद्धतीने उल्लेख केला. ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर केंद्रित होता. यामध्ये शिक्षण, सरकारी भरती, रोजगार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. मात्र, पुलकित मणीच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमातील हा भाग विशेष चर्चेत आला.

पहा व्हिडीओ-

मिमिक्रीदरम्यान राहुल गांधी आणि पुलकित यांच्यात संवादही झाला. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर या कार्यक्रमातील काही व्हिडीओ शेअर करण्यात आले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुलकित मणीसाठी मोदींची मिमिक्री हा नवा प्रकार नाही. त्याचा मोदींच्या व्यंगात्मक कंटेंटमधील एक व्हायरल व्हिडीओ यापूर्वी भारतात ब्लॉक करण्यात आला होता. तसंच कॉपीराइट स्ट्राइकशी संबंधित प्रकरणात त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतल्याचंही वृत्त आहे.

मिमिक्रीनंतर राजकीय वाद

इंदूरमधील कार्यक्रमातील सादरीकरणानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. मिमिक्रीमध्ये मोदींच्या दिवंगत आईचा आणि एका वृद्ध महिलेचा संदर्भ आल्याने हा प्रकार आक्षेपार्ह होता, असं भाजप नेते म्हणाले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर टीका करत पक्षाला ‘कॉमेडियन्स आणि जोकर्स’ असा उल्लेख केला. त्यामुळे एका कॉमेडियनच्या परफॉर्मन्समुळे सुरू झालेला हा विषय आता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us