बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार! नीतीश कुमारांचा JDU भाजपमध्ये जाणार? एका फोटोनं वाढवलं गूढ
Bihar JDU BJP Merger: मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर नीतीश कुमारांच्या JDU बाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपमध्ये विलिनीकरणाची तारीख निश्चित झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमधील एनडीए सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. मात्र नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून जेडीयू भाजपमध्ये विलीन होईल असा दावा विरोधी पक्ष करताना दिसून येत आहे. यावर आता एक अशी घडामोड समोर आली, ज्यामुळे बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. जेडीयू आणि भाजप विलयाची तारीखही ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जेडीयू नेते आणि केंद्रीय मंत्री लल्लन सिंह हेही उपस्थित होते. आता तो फोटो समोर आल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. आरजेडी आणि काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेतील फोटोवर प्रतिक्रिया देताना आरजेडीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, जेडीयू आता कधीही भाजपसोबतच्या विलीनीकरणाची घोषणा करू शकते. समाजवाद विकताना ते जातीयवादी दुकानाचे विक्रेते बनले आहेत, असं त्या म्हणाल्या. यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
यावर बिहार काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. स्नेहाशीष वर्धन म्हणाले की, भाजपने आपल्या आघाडीतील भागीदारांमध्येही स्लीपर सेल पुन्हा स्थापन केले आहेत. ते वेळोवेळी कठपुतळ्या म्हणून काम करतात. जेव्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला सारण्यात आले, तेव्हा जेडीयूच्या मूळ आणि समर्पित कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षातील स्लीपर सेल उघडपणे समोर आणले होते. परंतु भाजपच्या आशीर्वादाने ते जेडीयूमध्येच राहिले आहेत. जनता दल (युनायटेड) कोणत्याही क्षणी जेडीयूपासून वेगळे होऊ शकते.
स्नेहाशीष म्हणाले की, प्रत्येक राज्यात आपल्याच मित्रपक्षांना गिळंकृत करण्याचा भाजपचा मोठा इतिहास आहे आणि त्यांनी जेडीयूसोबतही असेच केल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपने उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षातही स्लीपर सेल नेमले आहेत आणि हे विधान परिषद निवडणुकीत स्पष्ट झाले होते. प्रादेशिक पक्षांनी भरभराट करावी असे भाजपला कधीच वाटत नाही आणि प्रादेशिक पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे वेळेत समजून घेतले पाहिजे.
राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संबंधांवर जोरदार टीका केल्याने बिहारच्या राजकारणातील शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. प्रियांका भारती यांनी जेडीयूच्या राजकीय विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आरजेडीने जेडीयूवर समाजवादाच्या तत्त्वांपासून विचलित झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.