BLOG : …जेव्हा भाईचा मूड ‘स्विंग’ होतो!

मुड असेल तर याच्यासारखा दिलदार, मजेशीर माणूस कोणी नाही. पण मुड गेला तर ये अपनी खुद की भी नही सुनेगा!

BLOG : ...जेव्हा भाईचा मूड 'स्विंग' होतो!
Nupur Chilkulwar

|

Jun 15, 2019 | 10:25 AM

एक तर माणूस एकदम दिलदार असतो अथवा प्रचंड सटकेल. पण सलमान खान नावाचं रसायनचं अजब आहे. त्याच्याबद्दल भरपूर चर्चा ऐकल्यात. चांगल्या-वाईट. त्याचा प्रत्यय मात्र पहिल्यांदाच आला. ‘भारत’ सिनेमाच्या यशाबद्दल सलमान मुलाखत देणार होता. सोबतीला आपला क्रश कॅट होतीच. त्यामुळे प्रचंड एक्साईटमेन्ट होती.  ‘जय हो’ नंतर तब्बल चार वर्षांनंतर सलमान मराठी मीडियाला मुलाखत देणार होता. कारण मध्ये त्याच्या बऱ्याच कॉन्ट्रो झाल्यात. त्यामुळे एकप्रकारे त्याने मीडियापासून दुरावाच केला होता म्हणा. पण ‘भारत’च्या निमित्तानं भाईजान पुन्हा एकदा जोरदार प्रमोशन करु लागले. सलमान आणि ईद हे गेल्या 10 वर्षांपासूनचं हिट समीकरण. त्यात फक्त ‘ट्युबलाईट’ आणि ‘रेस-3’ (हा सिनेमा टुक्कार असला तरी 160 कोटींची कमाई केली) अपवाद.

मागच्या आठवड्यात सिनेमा प्रदर्शनापूर्वी कतरिना आणि दिग्दर्शक अलीअब्बास जाफरच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा सलमान यंदाही मुलाखत देणार नाही हे जवळपास निश्चित झालं होतं. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तर हे निश्चितच झालं म्हणा. सिनेमा रिलीज झाला, बंपर ओपनिंग मिळालं, तब्बल 175 कोटींची कमाई सिनेमाने केली आणि भाईंचा मूड ‘स्विंग’ झाला. सिनेमा हिट झाला. त्याच्या सक्सेसबद्दल सलमान मुलाखत देतोय असा फोन अदल्या दिवशी आला. मग काय भाईजान से मिलने का मौका मिलनेवाला था इसलिए अपून भी फुल टू हवा में गया. आता सलमान-कतरिना जोडीने पहिल्यांदाच एकत्र मराठी मीडियाला मुलाखत देणार असल्यामुळे एक्साईटमेन्ट तर होतीच. बरं भाईजानचा पूर्वइतिहास बघता प्रश्नही काळजीपूर्वक काढावे लागणार होते. (उगाच ‘बजरंग’ होण्याची इच्छा नव्हती)

मेहबुब स्टुडिओत संध्याकाळी 7 वाजता मुलाखतीची वेळ ठरली. तिथेच ‘दबंग 3’च्या ‘मुन्ना बदनाम हुआ’ गाण्याचं शूट सुरु असल्यामुळे सलमान तिथेच होता. काहीवेळाने मॅडमसरचं आगमन झालं. आधी नेहमीप्रमाणे सलमाननं दिलदार पणा दाखवत, सामाजिक भान जपत 1947 साली फाळणीचा अनुभव घेतलेल्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्यासाठी खास स्क्रिनिंगचं सलमाननं आयोजन केलं होतं. ते झाल्यावर भारत आणि मॅडमसरची मुलाखत सुरु झाली. सिलेक्टेड 12 चॅनल-वेब आणि 2 ते 3 प्रिंट मीडियाला बोलावलं होतं. भाईजान फुल टू मुडमध्ये. मेहबुबचा 5 नंबरचा स्टुडिओ हॉल. सगळ्यांची धावपळ. मीडिया रिपोर्टर्स, टेक्निशियन, फिल्म पीआरची मंडळी, सलमानची टीम, कतरिनाची टीम सलमानची बहिण अलवीरा असा भलामोठा गोतावळा. पण या सगळ्या गदारोळात भाईजान जाम मूडमध्ये होता. प्रत्येक मुलाखत सुरु होण्याआधी फावल्या वेळात मस्त सिगारेटचा झुरका सोडत दबंग खान मोठमोठ्याने गाणं गात होता..’देखा है पहिला बार, साजन की ऑखो में प्यार’, ‘लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता’, ‘बहोत प्यार करते है तुमको सनम’, ‘ उॅंची है बिल्डिंग’ तसेच इतर गाणी सल्लू जोरजोरात गात होता. एवढ्या गदारोळातही त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आता एवढ्या मुलाखती द्यायच्या म्हंटल्यावर एकाच शर्टवर देईल तो सलमान कसला. बाहेर व्हॅनिटी असूनही तिथेच बिंधास्त शर्ट बदलवत होता.

आता हे सगळं बघून अपने भी मन में लड्डू फुटे, म्हंटलं इंटरव्ह्यू झाक होणार. पण थोड्यावेळाने ‘दुधात माशी पडावी’ तसा एका महाभागाने सलमानला कॉन्ट्रोव्हर्शियल प्रश्न विचारलाच. मग क्या भाईजान का मूड स्विंग हो गया. त्याच्या टीमची आता पळापळ. हा उरलेल्यांना मुलाखती देतो की जातो निघून. पण कदाचित अलविरा तिथेच असल्यामुळे तिने सिच्युएशन हॅण्डल केली. भाईजानचा मूड मात्र स्विंग झालाच. आता त्या महाशयांच्या मुलाखतीनंतर माझाच नंबर. सलमान आता जागेवरुन उठणार नाही त्यामुळे वेळेवर आम्हाला आमचा सेटअप हलवायला लागला. कमी वेळेत कॅमेरा सेट करायचा होता. आता ज्यांची मुलाखत उरली होती ते सगळेच त्या अतिशहाण्या रिपोर्टला शिव्या घालत होते.

रागानं लालबुंद झालेला सलमान, त्याच्यासमोर कतरिनाचीही पाचावर धारण बसली होती. त्यांच्यासमोर खुर्चीत बसलेला मी. मागच्या वेळेस कतरिनाला पहिल्यांदा भेटत असल्यामुळ धडधड होती.. आता कतरिना असूनही भाईजानकी वजहसे हो रही थी. बरं माझे निम्मे प्रश्न कतरिना आणि त्याच्या ‘मैत्री’वर फोकस करणारे मसालेदार. पण हे चित्र बघून बजरंग व्हायची तर मला अजिबात इच्छा नव्हती. कतरिनावर चिडलेल्या सलमानची नजर एकदम माझ्यावर पडली. भाईजान एकदम कूल.- चला भाऊ सुरु करुया मी- सर दोन मि. कॅमेरा सेट होतोयं

दुष्काळात तेरावा महिना सलमानला लेपल दिला. तो लेपल लाऊन बसला. आणि आमच्या कॅमेऱ्यामॅनला जाग आली. माईक कुठे, माईक कुठे ओरडू लागला. त्यावर सलमान – ऐ भाऊ लेपल लावला मी. मस्त सेट. कॅटीलाही लावलाये. मस्त सेट. आता लवकर. मला भूक लागलीये. उशीर झाला. आई वाट बघतेय माझी.

हे ऐकल्यावर कॅमेरा सेट झालाये की नाही चेक करताच मी मुलाखत सुरु केली. चांगली झाली. पण भाईचा मूड जर चांगला राहिला असता तर ती अजून चांगली झाली असती. त्याचा मूड गेल्यामुळे बरेच प्रश्न स्किप करावे लागले. काही प्रश्न डोक्यातचं नाही राहिले. तरी मधेच त्याच्यावर एक गुगली टाकण्याचं धाडसं केलं. त्यावर तो असा रिअॅक्ट झाला.

सलमान- अहंम.. माझा मुड चांगला होता. पण तो अभी खराब हो गया है. खुप उशीर झाला. मला वर्क आऊट करायचंय. घरी जायचंय. मुझे पाच इंटरव्ह्यू बोलके 15 करवाये. हे चुकीचं आहे.

मी त्याला मध्येच तोडतं मुलाखत पुढे सुरु केली. एवढ्या अडचणीत मुलाखत संपली आणि मी हुश्श… केलं. आता माझ्यानंतर एका नामांकित पेपरच्या वेबची मुलगी मुलाखत घ्यायला बसली. बरं दोन रिटेक घ्यावे लागल्यामुळे हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू असल्याचं सलमानला सांगून ती मोकळी झाली. मग काय भाईजाननं मुलाखतीदरम्यान तिची पार पिसं काढली. कोण कोणाची मुलाखत घेतंय हेच कळत नव्हतं. तिची मुलाखत संपवून सलमान सिगारेट प्यायला बाजूला आला. आम्ही आमचं सामान आवरत होतो. माझं लक्ष सलमानकडेच होतं. त्याने बघितलं अन् बोलला फोटो काढायचाये भाऊ. (परत सलमानचा मूड ‘स्विंग’ झाला). कारण आधी भाईजानचा मूड बघून मी फोटो न काढताच सटकलो होतो. आता मात्र मी कशाला चान्स सोडतोय. म्हटंलं यस सर. (कदाचित सलमानला माझी केविलवाणी नजर बघून कीव आली असावी). वेळ न दवडता फोटो काढला. या सगळ्या प्रकारात अलविराने मात्र सलमानला मस्त हॅण्डल केलं. कदाचित ती नसती तर तो निघून गेला असता.

हा असा भाईजान कसाही असला तरी  फॅन्ससाठी सर्वस्व आहे. यंदाही ईदच्या मुहुर्तावर ‘भारत’रुपानं भाईजाननं चाहत्यांना खास भेट दिली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. फॅन्सच्या कृपेने मला अजून बरेच रकॉर्ड मोडायचे आहेत असं सलमान मुलाखतीत बोलला आहेच. त्यामुळे त्याच्या आगामी रेकॉर्डवर नक्कीच नजर राहिल. मुलाखत संपवून बराच वेळ अस्वस्थ होतो. म्हंटलं ही जोडी परत कधी एकत्र भेटेल. जर त्या वायझेड माणसाने सलमानला उंगली केली नसती तर मुलाखत अजून भन्नाट झाली असती, हा विचार सारखा घोळतोय. (त्या अतिशहाण्या माणसाला माझी मुलाखत संपवून मी बाहेर पडल्यावर बऱ्याच शिव्या घातल्या. इतर लोकांनीही घातल्या.)

असो, एकूणच काय तर ज्या भाईजानबद्दल बरंच ऐकलं होतं, त्याचा असाही अनुभव जवळून घेतला. मुड असेल तर याच्यासारखा दिलदार, मजेशीर माणूस कोणी नाही. पण मुड गेला तर ये अपनी खुद की भी नही सुनेगा!

कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें