Adinath Kothare: मला आता थांबवत नव्हतं, मी थेट.. आदिनाथ कोठारे कधीच विसरू शकणार नाही ‘रामायण’च्या सेटवरील तो अनुभव
Adinath Kothare: ‘रामायण’मधील भरतची भूमिका साकारणाऱ्या आदिनाथने शूटिंगदरम्यानचे अनुभव सांगितले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आपुलकीच्या शब्दांपासून ते निर्माता नमित मल्होत्रांच्या बारकाईपर्यंत उलगडले अनेक खास क्षण..

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या नमित मल्होत्रा यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटातील भरतच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकतीच आदिनाथने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटातील महत्त्वपूर्ण ‘भरत मिलाप’ प्रसंगाच्या शूटिंगदरम्यानचे अनुभव सांगितले आहेत. ‘भरत मिलाप – अॅनॅटॉमी ऑफ अ सीन’ या शीर्षकाखाली त्याने शेअर केलेल्या या पोस्टमधून या प्रसंगामागची तयारी, मनातील दडपण आणि सेटवरील काही खास आठवणी उलगडल्या आहेत.
या पोस्टमध्ये आदिनाथने सांगितलं की, संपूर्ण शूटिंगदरम्यान तो ‘भरत मिलाप’ या प्रसंगाची आतुरतेने वाट पाहत होता. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कथाकथनाच्या शैलीचा तो नेहमीच चाहता राहिला आहे. विशेषतः ‘दंगल’ हा चित्रपट त्याच्या पिढीसाठी पटकथालेखनाचा एक आदर्श असल्याचंही त्याने नमूद केलं. मात्र, अनेक दिग्गज कलाकारांनी यापूर्वी साकारलेल्या भरतसारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेला आपण कसा न्याय देणार, याचं दडपणही त्याच्या मनात होतं.
शूटिंगपूर्वी रिहर्सलदरम्यान नितेश तिवारी यांनी केलेल्या एका छोट्याशा संवादाने आदिनाथचं हे दडपण दूर झालं. आदिनाथच्या ऑडिशनची आठवण करून देत नितेश सरांनी त्याच्या अभिनयातील प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आणि भरतच्या व्यक्तिरेखेसाठी नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्यांच्या या शब्दांमुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचं आणि मनातील अनावश्यक विचार दूर झाल्याचं आदिनाथने सांगितलं.
आदिनाथने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'संपूर्ण शूटिंगदरम्यान मी एका विशिष्ट प्रसंगाची आतुरतेनं वाट पाहत होतो. माझ्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची ती संधी होती. तोपर्यंत मी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या मागे राहून, त्यांची काम करण्याची पद्धत जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. चित्रपटाचा आवाका प्रचंड होता, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा कधीच ढळला नाही. जवळपास दशकभर एखादं विश्व विटा-विटांनी उभं केल्यानंतरच अशी स्थिरता येते.'
'कलाकार म्हणून आपण एखादा प्रसंग कसा साकारायचा, याच्या अनेक कल्पना मनात तयार करत असतो. अनेकदा स्वतःकडून खूप अपेक्षाही ठेवतो. ‘भरत मिलाप’ हा प्रसंग अनेक पिढ्यांमधील दिग्गज कलाकारांनी साकारला आहे. मग मी त्यांच्या तोडीस तोड कसा ठरेन? हा विचार मनात कुठेतरी दडपण निर्माण करत होता आणि मला हे सगळं बाजूला ठेवणं गरजेचं होतं, याची जाणीव झाली. शूटिंगपूर्वी कॉस्च्युम टीमने भरतचा मुकुट आणला. त्यात काही बदल करायचे असल्यामुळे तो पुन्हा नेण्यात आला,' असं त्याने पुढे लिहिलं.
'मला आता थांबवत नव्हतं. त्यामुळे मी रिहर्सलसाठी थेट दिग्दर्शकांच्या व्हॅनिटीच्या दिशेने गेलो. नितेश सरांनी अतिशय आपुलकीने माझं स्वागत केलं आणि त्यामुळे माझ्या मनात सुरू असलेला विचारांचा गोंधळ क्षणात कमी झाला. आम्ही दोघंही स्क्रिप्ट घेऊन समोरासमोर बसलो. पहिल्याच प्रयत्नात माझे संवाद अचूक व्हावेत, अशी माझी अपेक्षा होती. मनात कुठेतरी त्यांच्या कौतुकाची आणि खात्रीची अपेक्षाही होती. आणि मग त्या जादूगाराने आपली जादू दाखवली,' असा अनुभव आदिनाथने सांगितला.
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, 'मी वाचन सुरू करण्यापूर्वी नितेश सरांनी भरतच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, “मला तुझी टेस्ट आठवते. तू खूप प्रामाणिक होतास. भरतसाठी नेमकी हीच गोष्ट आवश्यक आहे.” त्यांनी हे सांगण्याची गरजही नव्हती, पण मला नेमकं काय ऐकण्याची गरज आहे, हे त्यांना माहीत होतं. हीच नितेश तिवारी यांची काम करण्याची पद्धत आहे – समोरच्या व्यक्तीला समजून घेणं आणि त्याच्याप्रती सहानुभूती ठेवणं.'
'माझ्या मनावरील सगळं दडपण दूर झालं. मी चित्रकूटच्या सेटवर पोहोचलो, तेव्हा माझ्यासमोर जणू प्रत्यक्ष दिव्यत्वच अवतरलं होतं श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या उपस्थितीने ‘रामायण’चा संपूर्ण सेट एका दैवी ऊर्जेने भारून गेला होता. शेवटच्या तयारीसाठी मी माझ्या मार्कवर उभा असताना, कॉस्च्युम टीम सुधारणा केलेला मुकुट घेऊन आली. त्यांच्यासोबत निर्माते नमित मल्होत्राही स्वतः उपस्थित होते. नितेश सरांची दृष्टी जशीच्या तशी पडद्यावर उतरावी, यासाठी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत ते मुकुट व्यवस्थित बसेपर्यंत तिथेच थांबले. यावेळी मुकुट अगदी योग्य बसला होता,' अशा शब्दांत तो व्यक्त झाला.