किस करावंच लागेल.. ऐश्वर्यासोबत निर्मात्याची बळजबरी; नकार मिळताच दिली धमकी
आज ऐश्वर्या शर्मा टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतील भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती ‘खतरों के खिलाड़ी 13’ आणि ‘बिग बॉस 17’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली आहे.

टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका निर्मात्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं आणि त्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तिने केला. या घटनेमुळे इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐश्वर्याने हिबा नवाबच्या शोमध्ये तिच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की, अभिनय क्षेत्रात काम सुरू करण्यापूर्वीच तिला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका निर्मात्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र, ही भेट तिच्यासाठी अत्यंत विचित्र आणि अस्वस्थ करणारी ठरली.
संबंधित निर्मात्याने तिला किस करण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याने त्याला स्पष्टपणे नकार दिल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. नकार दिल्यावर त्या व्यक्तीने तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नसल्याची भीती दाखवल्याचं तिने सांगितलं. ‘इथे मुलींना काम कसं मिळतं, हे तुला माहीत नाही’, अशा प्रकारचं बोलून तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं तिने सांगितलं.
मात्र, ऐश्वर्या घाबरली नाही. तिने त्या व्यक्तीला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि तिथून निघून गेली. करिअरच्या सुरुवातीलाच आलेल्या या अनुभवाने तिला मोठा धक्का बसला होता. पण कोणत्याही प्रकारच्या तडजोडीपेक्षा स्वतःचा आत्मसन्मान महत्त्वाचा असल्याचं तिच्या भूमिकेतून दिसून आलं.
ऐश्वर्याने याचबरोबर अशा प्रकारच्या गैरवर्तनासाठी काही लोक आधीपासूनच नियोजन करत असल्याचंही सांगितलं. तिच्या मते, समोरची व्यक्ती इतकी विश्वासार्ह वाटू शकते की आपल्यासोबत काही चुकीचं होईल, याची कल्पनाही येत नाही, असं तिने म्हटलंय.