
गोविंद सन्मान सोहळ्यात कलाकारांनी राधाविलास हा अप्रतिम प्रवेश सादर केला. कधीकाळी राजारामबापू यांनी गोंधळाला वेगळे आयाम प्राप्त करून दिले. मात्र, आज या कलेला राजाश्रय उरला नाही. गोंधळी कलाकार उपेक्षेत जगत आहेत. त्याची दखल घेवून रसिकांनी, कलाप्रेमींनी या कलेला उदार आश्रय दिला पाहिजे, असे आवाहन या कलाकारांनी यावेळी केले.

गोंधळ सादरीकरणावेळी परंपरेप्रमाणे तेल आणि तुपाचा पोत पाजळला जातो. तो ही इथे पाजळण्यात आला. त्यानंतर सादर झालेले एकेक गीत, सादरीकरण आणि कलाप्रकारांनी सारेच भारावून गेले. शिवकाळात सुद्धा गोंधळ आणि पोवाड्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. या कलांना अजूनही महाराष्ट्रात प्रेम लाभते.

सोहळ्यात आधी देवीचा चौक पारंपरिक पद्धतीने पुजला गेला. त्यानंतर गणेश स्तवन रंगले. त्या पाठोपाठ देवीचे स्तवन सादर केले गेले. गोंधळी कलेतील या वेगवेगळ्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हा अनोखा पदन्यास पाहताना रसिकांचे भान हरपल्याचे पाहायला मिळाले. ही परंपरा जतन केली पाहिजे, असा आशावाद यावेळी कलाकारांसह उपस्थितांनी व्यक्त केला.

औरंगाबादमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कै. गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात मराठवाड्यातील ज्येष्ठ व्यक्तीस 'गोविंद सन्मान' प्रदान करण्यात येतो. यंदा या पुरस्काराने कदमराई गोंधळ परंपरेतील कलावंत गुलाबराव कदम गोंधळी यांचा ज्येष्ठ गायक विश्वनाथ ओक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सी. बी. देशपांडे, माधुरी गौतम, भारत कदम, प्रा. सी. बी. देशपांडे, श्रीकांत उमरीकर, नामदेव शिंदे, अनिल पाटील उपस्थित होते.