
मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. बकरी ईद हा केवळ सण नसून तर मित्र आणि कुटुंबियांसोबत उत्तम मेजवानीचा प्रसंग असतो. बकरी ईदच्या मेजवानीमध्ये कोरमा, बिर्याणी यासोबतच गोड पदार्थांनाही विशेष महत्त्व दिले जाते. जर तुम्हाला बकरी ईद निमित्ताने काहीतरी खास गोड पदार्थ बनवायचे असतील, तर हे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून तुम्ही पाहुण्यांचे मन जिंकू शकता.

शीर खुरमा हा ईद आणि बकरी ईदच्या निमित्ताने तयार केला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे. याची चव फारच खास आहेत. हा बनवण्यासाठी, सर्वप्रथम तुपात शेवया सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता एका भांड्यात दूध उकळा. त्यात भाजलेल्या शेवया घाला. यासोबत मावा किंवा कंडेन्स्ड मिल्क देखील घाला. १०-१५ मिनिटे शिजवा. त्यानंतर त्यात साखर, खजूर आणि ड्रायफ्रूट टाका. यानंतर वेलची पूड घालून गरम सर्व्ह करा.

बकरी ईदच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरनीही बनवली जाते. ही फिरनी बनवायला खूपच सोपी असते. यासाठी भिजवलेले तांदूळ वाटून जाडसर पेस्ट बनवा. दूध उकळा. त्यात तांदळाची पेस्ट मिसळा. सतत ढवळत मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर साखर, केशर, गुलाबपाणी आणि वेलची घाला. बाऊलमध्ये घालून थंड करा आणि ड्रायफ्रूटने टाकून सर्व्ह करा.

बकरी ईदच्या निमित्ताने तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही रोज मलाई कुल्फी बनवू शकता. हे बनवण्यासाठी दूध घट्ट होईपर्यंत उकळा. त्यात कंडेन्स्ड मिल्क, वेलची आणि सुकामेवा घाला. थंड करा. त्यानंतर त्यात रोज सिरप मिसळा. कुल्फी मोल्डमध्ये भरा आणि ६-८ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. पाहुण्यांना जेवण झाल्यावर थंडगार सर्व्ह करा.

बकरी ईदनिमित्ताने लखनऊचा प्रसिद्ध शाही तुकडा तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. शाही तुकडा बनवण्यासाठी ४ ब्रेड घ्या आणि त्यांना त्रिकोणी आकारात कापून तळून घ्या. यानंतर दुधापासून रबडी बनवा आणि तळलेल्या ब्रेडवर घाला. त्यावर ड्रायफ्रूटस, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवा.

बकरी ईदच्या निमित्ताने तुम्ही पाहुण्यांना अरेबियन पुडिंग खायला घालू शकता. हे बनवण्यासाठी, सर्वप्रथम दुधात कस्टर्ड पावडर घालून मिश्रण तयार करा. यानंतर एका ट्रेमध्ये व्हाईट ब्रेडवर क्रीम लावून थर तयार करा. यानंतर कस्टर्ड मिश्रण ब्रेडवर घाला. याचे २ थर तयार करा आणि त्यावर ड्रायफ्रूट्स आणि फळे घालून सजवा.