बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडलं, प्रेमावरून विश्वासच उडाला..; 13 वर्षांपासून सिंगल आहे ‘CID’ फेम अभिनेत्री
सीआयडी फेम अभिनेत्रीने सांगितलं की, आता तिला मुक्त जगायचं आहे. लग्न, मुलं आणि जोडीदार यांबाबत समाजाच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या आनंदाला महत्त्व देण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर पूर्वीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंशा सय्यद सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 38 व्या वर्षीही अंशा अविवाहित असून, गेल्या 13 वर्षांपासून ती सिंगल आयुष्य जगत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या प्रेमसंबंधांबद्दल, ब्रेकअपबद्दल आणि लग्नाच्या निर्णयाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. विशेष म्हणजे, आता तिला लग्न करण्याची किंवा आई होण्याची इच्छा नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
अंशा सय्यदने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. अभिनेत्रीने सांगितलं की, तिचं ब्रेकअप होऊन जवळपास 15 वर्षे झाली आहेत. त्या नात्यात तिला मोठा धक्का बसला होता. आपल्या प्रियकराला दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवताना पकडल्यानंतर तिने त्याच्याशी ब्रेकअप केलं.
या घटनेनंतर तिने स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं. ब्रेकअपनंतर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले. कामात व्यस्त राहून तिने स्वतःला सावरलं आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
अंशाने सांगितले की, गेल्या 13 वर्षांपासून ती कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. या काळात तिने कोणत्याही व्यक्तीसोबत डेटिंग केलेलं नाही. इतकंच नाही, तर वन नाइट स्टँड किंवा सिच्युएशनशिपसारख्या नात्यांपासूनही तिने दूर राहणं पसंत केलं.
अभिनेत्रीच्या मते, आत्मनिर्भर महिलांना अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले जातात. तिच्या सिंगल असण्याचं कारण काय, तिचा जोडीदार का नाही, असे प्रश्न तिला वारंवार विचारले जातात. मात्र, आता तिला या प्रश्नांचा फारसा फरक पडत नाही.
अंशाने सांगितलं की, पूर्वी तिलाही एकटेपणा जाणवत होता. आजूबाजूच्या लोकांची लग्न होताना, मुलं होताना पाहून आपल्यालाही जोडीदार असावा, असं तिला वाटायचं. मात्र, आता तिचा दृष्टिकोन बदलला आहे.
तिच्या आयुष्यात चांगले मित्र आहेत, ज्यांच्यासोबत ती आपल्या भावना आणि विचार शेअर करू शकते. त्यामुळे आता तिला एकटेपणा जाणवत नाही. अंशाने सांगितलं की, तीन ते चार वर्षांपूर्वी तिला जाणवलं की आयुष्यात आनंदी राहण्यासाठी एखाद्या पुरुषाची किंवा जोडीदाराची गरज नाही.
त्यामुळे सध्या तरी ती लग्न करण्याच्या विचारात नाही. मात्र, भविष्यात एखादी योग्य व्यक्ती भेटली आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली, तर ती या निर्णयाचा विचार करू शकते.
आई होण्याबद्दलही अभिनेत्रीने स्पष्ट भूमिका मांडली. पूर्वी तिला आई होण्याची इच्छा होती, पण आता ती इच्छा राहिलेली नाही. सध्या तिला कोणत्याही बंधनाशिवाय, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचं आहे.