
योगायोगाने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आणि तिचे वडील सुपरस्टार राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. ट्विंकल जितकी सुंदर आहे, तितकीच ती बेधडक देखील आहे. एक काळ असा होता की, ट्विंकल खन्नाच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले होते, पण ट्विंकलचे मन बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारवर आले होते. आज आम्ही तुम्हाला ट्विंकलशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत.

ट्विंकल खन्नाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत दोनदा साखरपुडा केला होता. अक्षयसोबत पहिल्यांदाच एंगेजमेंट तोडल्यानंतर ट्विंकल खूप अस्वस्थ झाली होती. त्यावेळी अक्षयच्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या, त्यामुळे ट्विंकल आणि अक्षयचे नाते कमकुवत झाले. काही काळानंतर त्यांच्या नात्यात पुन्हा बहार येऊ लागली आणि दोघांनी 2001मध्ये लग्न केले.

अक्षयसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकलने अनोखी अट ठेवली होती. त्यावेळी ट्विंकल तिच्या 'मेला' चित्रपटासाठी खूप उत्सुक होती. हा चित्रपट नक्कीच चालेल, असा विश्वास ट्विंकलला होता. तिने अक्षयला सांगितले की, 'जर हा चित्रपट चालला नाही तरच ती त्याच्याशी लग्न करेल'. 'मेला' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही आणि दोघांनी लग्न केले.

ट्विंकल खन्नाने तिच्या कारकिर्दीत त्या काळातील प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले होते. तिने करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट नाकारल्याचे फारशा लोकांना माहितीही नाही. करण जोहरने ट्विंकलला डोळ्यासमोर ठेवून टीनाची भूमिका लिहिली होती. ट्विंकल खन्नाच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरित होऊन हे पात्र लिहिण्याचा विचार त्यामागे होता.

ट्विंकल खन्नाला सुरुवातीपासूनच इंटिरिअर डेकोरेशनमध्ये रस होता. त्यामुळे ती तिची अभिनय कारकीर्द सांभाळत तर होतीच, परंतु आर्किटेक्ट म्हणून अर्धवेळ नोकरीही करत होती. याच कारणामुळे तिने आपली आवड जोपासत स्वतःला चित्रपटांपासून दूर केले. ट्विंकल खन्नाचे मुंबईत ‘द व्हाईट विंडो’ नावाचे लाईफस्टाईल स्टोअर देखील आहे.