
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तर आता कंगना रनौतनं आपला आगामी चित्रपट 'इमरजेंसी' स्वत: दिग्दर्शित करण्याची घोषणा केली आहे.

चित्रपटाची कथा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतंच कंगनानं देखील या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती चित्रपटाच्या तयारीची झलक दाखवतेय.

हा चित्रपट यापूर्वी ‘रिव्हॉल्व्हर राणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर दिग्दर्शित करणार होते, मात्र कंगना व्यतिरिक्त या चित्रपटाला कोणीही न्याय देऊ शकत नाही असं कंगनानं बुधवारी सांगितलंय.

तिनं कूवर लिहिलं की, ‘दिग्दर्शनाच्या जगतात पुन्हा पाऊल टाकताना आनंद वाटतोय.'इमरजेंसी' वर एक वर्षापेक्षा जास्त काळ काम केल्यावर मला वाटतंय की या चित्रपटाचं दिग्दर्शन माझ्यापेक्षा चांगलं कोणीच करू शकत नाही. मी लेखक रितेश शहा यांच्यासोहत यावर काम करत आहे, त्यासाठी मला अभिनयाशी संबंधित काम बाजूला ठेवावे लागत असतील तरी मी तयार आहे."

वर्षाच्या सुरूवातीला कंगनानं म्हटलं होतं की, 'इनरजेंसी' या चित्रपटाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींचे दोन मोठे निर्णय, ऑपरेशन ब्लू स्टार आणि आणीबाणी दर्शविली जाणार आहे.

कंगना रनौतनं यापूर्वी 2019 मधील मणिकर्णिका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ' इमरजेंसी' चित्रपटाशिवाय ती सध्या 'थलाईवी', 'धाकड', 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' वर काम करत आहे.