मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच मुंबईतल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असून आयुष्यातील या नव्या टप्प्याचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. नुकतंच दीपिकाला पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध हॉटेलबाहेर पाहिलं गेलं. मंगळवारी हे दोघं 'बेन्ने डोसा' या अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये लंच डेटनंतर दीपिका आणि रणवीर तृप्त मनाने रेस्टॉरंटबाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी दोघंही कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले. दीपिकाने कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट घातला होता, तर रणवीरसुद्धा टी-शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसला. यावेळी दोघांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता.

'बेन्ने' या रेस्टॉरंटमध्ये दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच गेले नाहीत. तर याआधीही दोघं 'धुरंधर 2'चा यश साजरा करण्यासाठी याठिकाणी गेले होते. त्यावेळी या रेस्टॉरंटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर संपूर्ण टीमसोबत दीपिका-रणवीरने काढलेला सेल्फी पोस्ट करण्यात आला होता.

दीपिका ही मूळची दक्षिण भारतातली असल्याने तिला डोसा, इटली यांसारखे पदार्थ खूप आवडतात. म्हणूनच मुंबईतील 'बेन्ने' हे तिचं आवडतं रेस्टॉरंट बनलं आहे. याआधी रणवीर आणि दीपिकाला वरळी इथल्या 'मासळी' या हॉटेलमध्येही जेवताना पाहिलं आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये इटलीत लग्नगाठ बांधली होती. कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही विवाहपद्धतींनुसार विधी पार पडले होते. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये दीपिकाने मुलीला जन्म दिला. दुआ असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. तर 'धुरंधर 2'च्या यशानंतर दीपिकाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं.