शानदार.. जबरदस्त.. 54 दिवसांत 1.53 कोटी प्रेक्षकांनी पाहिला चित्रपट; कमावला तब्बल 15519% नफा
अत्यंत कमी बजेट बनलेल्या आणि सुरुवातीला अनेकांकडून नकार पचवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालच केली आहे. गेल्या पन्नास दिवसांपासून हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे.

नीम करोली बाबा यांच्या जीवनाशी संबंधित भक्ती आणि अध्यात्मावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करत आहे. रिलीज होऊन तब्बल 54 दिवस उलटले असतानाही चित्रपटाची कमाई थांबलेली नाही. उलट, मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत तब्बल 37.77 टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडे समोर आले आहेत.
विशेष म्हणजे, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘द वन’, नानीचा ‘द पॅराडाइज’ आणि ‘अॅव्हेंजर्स: एंडगेम एनकोर’सारख्या चित्रपटांच्या रिलीजचाही ‘हनुमान अंश’च्या कमाईवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. डॉ. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित आणि शोभिनव सत्य स्टारर ‘हनुमान अंश’ 7 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ 10 लाख रुपयांची कमाई केली होती. मात्र, त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद सातत्याने वाढत गेला आणि चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार केला. 2026 मध्ये भारतात 300 कोटींपेक्षा जास्त नेट कमाई करणारा हा दुसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.
'सॅकनिल्क'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 54व्या दिवशी भारतात 4411 शोजमधून 3.10 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाने 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 54 दिवसांनंतर भारतातील चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 312.38 कोटी रुपये झालं आहे. तर देशातील ग्रॉस कलेक्शन 369 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
11 सप्टेंबर रोजी ‘हनुमान अंश’ परदेशातही प्रदर्शित करण्यात आला. परदेशातील सुमारे 39 कोटी रुपयांच्या ग्रॉस कमाईसह चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 408 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरात सुमारे 1.53 कोटी फुटफॉल नोंदवला आहे. म्हणजेच तब्बल दीड कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला आहे.
चित्रपटाच्या यशामागे भक्तीभाव आणि नीम करोली बाबा यांच्याविषयी असलेली श्रद्धा महत्त्वाची ठरत असल्याचे या आकडेवारीवरून दिसतंय. 24 सप्टेंबरपर्यंत केवळ 'बुक माय शो'वरून ‘हनुमान अंश’ची 70,08,940 तिकिटं विकली गेली होती. त्यानंतरच्या दिवसांमध्येही या संख्येत वाढ झाल्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशात 312.38 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा ROI तब्बल 310.38 कोटी रुपये असून, दिलेल्या आकडेवारीनुसार परतावा म्हणजेच प्रॉफिट तब्बल 15,519 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.