आता प्रत्येक औषध होणार पास, नापास, सरकारची मशीन सगळं सांगणार; बनावट औषध आढळल्यास…मोठा निर्णय!
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आता राज्यातील रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. ही तपासणी मशीनच्या माध्यमातून राज्यातील 8 विभागांमध्ये केली जाणार आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण औषधे मिळावीत यासाठी आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाची औषधे ओळखण्यासाठी ‘ड्रग्ज डिटेक्शन मशीन’ आणण्यात आले आहे. राज्यातील आठ विभागांमध्ये या मशीनची व्यवस्था केली जाणार आहे.
रुग्णालयांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांची या मशीनच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. औषधांच्या गुणवत्तेत काही त्रुटी असल्यास किंवा भेसळीचा संशय असल्यास त्या वेळेत ओळखण्यास मदत होईल.
यामुळे निकृष्ट दर्जाची औषधे रुग्णांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच आवश्यक ती कारवाई करता येऊ शकते. या मशीनद्वारे तपासणी केल्यानंतर औषध निर्धारित निकषांनुसार योग्य आढळल्यास ‘पास’, तर तपासणीत त्रुटी आढळल्यास ‘फेल’ असा संकेत मिळणार आहे.
या उपक्रमामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.