ना गर्दी, ना गोंगाट.. सह्याद्रीच्या कुशीत लपलंय स्वर्गाहून सुंदर गाव; महाराष्ट्रातील ‘मिनी महाबळेश्वर’
शहराच्या धावपळीपासून काही दिवस दूर राहायचं असेल, तर कोकणातील या अनोख्या हिल स्टेशनला नक्की भेट द्या. कारण माचाळमध्ये तुम्हाला फक्त फिरण्याचा आनंद मिळणार नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःसाठी निवांत वेळही अनुभवता येईल.

महाराष्ट्रात फिरण्यासाठी समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि धबधबे असे अनेक पर्याय आहेत. पण तुम्हाला गर्दीपासून दूर, थंडगार वातावरणात, धुक्याच्या चादरीत हरवून जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतं.
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेल्या या छोट्याशा गावाला 'कोकणचं मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, निसर्गसौंदर्यासोबतच या गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याच्या पूर्व भागात माचाळ हे निसर्गरम्य गाव वसलेलं आहे. या गावाचं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं.
गावाच्या सभोवताल घनदाट जंगल, डोंगररांगा आणि विस्तीर्ण पठार आहे. पावसाळ्यात तर संपूर्ण परिसर हिरवागार होतो. डोंगरांवरून वाहणारे धबधबे, दाट धुकं आणि थंड वाऱ्यामुळे पर्यटकांना एखाद्या हिल स्टेशनवर आल्याचा अनुभव मिळतो. माचाळमध्ये गेल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे मुचकुंद ऋषींची गुहा. या गुहेला धार्मिक आणि स्थानिक सांस्कृतिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या काळात स्थानिक नागरिक इथं विशेष उत्सव साजरा करतात.
याशिवाय माचाळच्या पठारावरून दिसणारी सह्याद्रीची विहंगम दृश्यं मनाला भुरळ घालतात. इथं उगम पावणारी मुचकुंदी नदी हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या नदीच्या प्रवाहात अनेक धबधबे आणि नैसर्गिक रांजणखळगे पाहायला मिळतात. त्यामुळे ट्रेकिंग आणि निसर्गभटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी हा परिसर खास आहे.
पावसाळ्यात माचाळचं सौंदर्य खुलून दिसतं. मात्र या काळात मुसळधार पाऊस, निसरड्या वाटा आणि धुक्यामुळे प्रवासात काळजी घेणं आवश्यक आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ निसर्गभटकंती आणि ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. माचाळला जाण्यासाठी लांजा हे महत्त्वाचं ठिकाण आहे. लांजा इथून स्थानिक रस्त्याने माचाळकडे जाता येतं. जवळच्या रेल्वे प्रवासासाठी कोकण रेल्वेवरील रत्नागिरी स्थानकाचा पर्याय उपलब्ध आहे. पुढील प्रवास रस्त्याने करावा लागतो.
माचाळ हे अद्याप विकसित होत असलेलं पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे प्रवासापूर्वी रस्त्यांची स्थिती, स्थानिक निवासव्यवस्था आणि जेवणाची उपलब्धता याची चौकशी करा. परिसरात मोबाईल नेटवर्कही मर्यादित असू शकतं. निसर्गाची स्वच्छता राखा आणि स्थानिक नियमांचं पालन करा.