
प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा तिच्या सुरेल गायनासाठी ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनंदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

या मुलाखतीत सुनंदाने तिच्या मासिक पाळीविषयीचा एक प्रसंग सांगितला. “जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली, तेव्हा मी सर्वांत आई माझ्या आईऐवजी वडिलांना त्याबद्दल सांगितलं होतं”, असा खुलासा तिने केला.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या या मुलाखतीत सुनंदा म्हणाली, “आमच्या शाळेत कधीच आम्हाला मासिक पाळीविषयी सांगितलं गेलं नव्हतं. माझ्या घरातसुद्धा कधीच कोणी याविषयी बोललं नाही. पीरियड्सविषयी माझा पहिल्यांदा संवाद वडिलांसोबतच झाला होता. ”

“माझं वडिलांसोबतचं नातं इतकं भक्कम आहे की मासिक पाळीविषयी मी सर्वांत आधी त्यांनाच सांगितलं होतं, आईला नाही. मी थेट माझ्या वडिलांकडे पळत गेले होते. मी नेहमीच माझ्या वडिलांशी विविध मुद्द्यांवर मोकळेपणे बोलते. त्यामुळे मला कुठलाही संकोच वाटला नाही”, असं तिने स्पष्ट केलं.

मासिक पाळीविषयी मोकळेपणे बोलताना आजही अनेक महिलांना संकोच जाणवतो. याविषयी आजही तितक्या मोकळेपणे बोललं जात नाही. त्यामुळे सुनंदाने केलेल्या या खुलासावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.