मालिकेचा पहिल्याच आठवड्यापासून दबदबा; टॉप 10 मध्ये मिळवलं स्थान, जोडी सुपरहिट
झी मराठी वाहिनीवरील या मालिकेनं येताच क्षणी तुफान चर्चा घडवून आणली आहे. अगदी पहिल्याच आठवड्यात या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल आहे. टॉप 10 मध्ये या मालिकेनं स्थान मिळवलं आहे. यातील जोडीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत सनई चौघडे मालिकेनं स्थान मिळवलं आहे.

कथानकातील वेगळेपण, भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका ज्या आठवड्यात लाँच झाली, तेव्हा एक अनोखा उपक्रम राबवला गेला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने 7000 हून अधिक स्वामी भक्तांसोबत ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली.

आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज असणार आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सने ओळखला जाणारा, बहुप्रतिभावान आणि संवेदनशील भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’मध्ये दमदार कमबॅक करत आहे.

या मालिकेत चिन्मय ‘सत्यजीत’ ही भूमिका साकारणार आहे. सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या योगायोगमुळे कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार आहे.

शर्वरीला ही नोकरी मिळेल का? सत्यजीतच्या एण्ट्रीमुळे जय आणि शर्वरीच्या नात्यात काही बदल होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.