Rahul Gandhi : खरा हिंदू म्हणून… ‘पप्पांच्या मांडीवर मम्मी’ वक्तव्यावरून भाजपची टीका, राहुल गांधींचा जोरदार पलटवार
आई सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादाला राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोनिया गांधी आणि वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी, यांच्या नात्याबद्दल त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, ज्यावरून आता राजकीय वाद सुरू झाला आहे. पप्पांच्या मांडीवर मम्मी या त्यांच्या विधानावरून भाजपने आणि भाजप समर्थकांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरून आता राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात भीती, राग आणि द्वेषाचं जाळं आहे. त्यांना या जाळ्यातून बाहेर काढणं हे एक खरा हिंदू म्हणून माझं कर्तव्य असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, भाजप आणि आरएसएस समर्थकांच्या मनात भीती, राग आणि द्वेषाचं जाळं निर्माण झालं आहे, जे त्यांना प्रेम अनुभवण्यापासून आणि व्यक्त करण्यापासून थांबवत आहे. खरा हिंदू म्हणून त्यांना या जाळ्यातून मुक्त करणं, जेणेकरून त्यांनाही प्रेमाने आपुलकीचा आनंद अनुभवता येईल, हे माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. पोस्टमध्ये त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ असंही लिहिलं आहे.
आई-वडिलांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोललेले राहुल गांधी
दरम्यान, सोमवारी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राहुल गांधी यांनी आई-वडिलांच्या नात्यातील जवळिकीचा किस्सा सांगितला होता, जेवताना आई सोनिया गांधी नेहमी वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर बसायच्या. आपल्याला लहानपणी ही अगदी सामान्य गोष्ट वाटायची, असं त्यांनी मिश्कील पद्धतीने सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावरून विविध प्रतिक्रिया आल्या. काहींनी टीका केली, तर अनेकांनी त्यांच्या आई-वडिलांमधील प्रेमाचं भरभरून कौतुक केलं.
राहुल यांच्या पोस्टमध्ये कर्नाटकातील हळेबीडूतील एका शिल्पाचा फोटोही शेअर करण्यात आला होता. या शिल्पामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती नंदीवर एकत्र बसलेले दिसतात. याच फोटोवरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल यांच्यावर टीका केली. कोणत्याही माणसाची तुलना देवासोबत होऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
यावेळी भाजपने राहुल गांधींच्या या पोस्टवरून भाजपने थेट अलाउद्दीन खिलजी, मलिक काफूर आणि मोहम्मद बिन तुघलक यांच्यापर्यंत जात राहुल गांधींना सवाल केले. हळेबीडूची पूर्वीची राजधानी द्वारसमुद्र हे नाव कसं पडलं, तिथे झालेल्या ऐतिहासिक विध्वंसाचा 1311 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर आणि 1326-27 मध्ये मोहम्मद बिन तुघलकाच्या सैन्याने हळेबीडूवर हल्ले करून मंदिरांची तोडफोड केल्याचा दावा भाजपने केला. तसेच तिथल्या खंडित मूर्तींचे चेहरे आणि हात कोणी तोडले, असा सवालही उपस्थित केला.
