
परभणीतील धनुबाई प्लॉट इथल्या मारुती दुबाकर यांच्या घरात अजब घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातील एलसीडी टीव्हीमध्ये चक्क साप आढळला. सर्पमित्र रणजीत कारेगावकर यांनी त्या सापाला पकडलं.

बुधवारी 25 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास दुबाकर यांच्या घरातील महिलांना मालिका बघताना टीव्हीच्या स्क्रीनवर सापासारखं काहीतरी वळवळताना दिसलं. सुरूवातीला तो मालिकेमध्येच असेल असं त्यांना वाटलं होतं. परंतु चॅनल बदलूनही स्क्रीनवर तसंच दिसत असल्याने त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला.

याबद्दल घरातल्या मुलींनी त्याचा व्हिडीओ काढून शेजारी राहणाऱ्या रमेश थोरात यांना कळवलं. थोरात यांनी सर्पमित्र रणजित कारेगावकर यांना बोलावलं. राजेश दुबाकर हे स्वतः टीव्ही मेकॅनिक असल्यामुळे त्यांनी त्वरीत तो एलसीडी टीव्ही घराबाहेर नेऊन उघडण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा टीव्हीची स्क्रीन काढण्यात आली, तेव्हा त्याच्या एका कोपऱ्यात छोटा साप आढळला. हा साप कारेगावकर यांनी लगेच पकडून तो कवड्या जातीचा बिनविषारी साप असल्याचं सांगितलं. यावेळी ज्ञानेश्वर खटिंग, राजेश दुबाकर यांनी कारेगावकर यांना सहकार्य केलं.

पावसाळ्यात अनेकदा हे छोटे साप नाल्याच्या ठिकाणी, ओलाव्याच्या ठिकाणी दिसतात. परभणीतीली दुबाकर यांच्या घरातील टीव्हीमध्ये हा छोटासा साप कसा शिरला, हा कुतुहलाचा विषय आहे. सर्पमित्राच्या मदतीने त्यांनी या सापाच्या पिल्लाची सुटका केली आहे.