अवघ्या 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर’, ‘पठाण’, ‘डंकी’चाही मोडला रेकॉर्ड
Spider Man Brand New Day: 'स्पायडर मॅन : ब्रँड न्यू डे' या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत शाहरुख खान आणि रणवीर सिंह यांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

हॉलिवूडचा सुपरहिरो चित्रपट 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे'नं भारताच्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत हा चित्रपट 2026 मधील भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. तब्बल 216 कोटी रुपयांचा गल्ला जमवत हा सर्वांत मोठा हॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट बनला आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी (30 जुलै, 2026) या चित्रपटाने 73 रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तर शुक्रवारी 58.4 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. 'माऊथ पब्लिसिटी' आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे प्रेक्षकांनी शनिवारी थिएटर्समध्ये आणखी गर्दी केली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारच्या कमाईत थेट 46 टक्क्यांची वाढ झाली. हा आकडा शनिवारी 85 कोटी रुपयांवर पोहोचला.

अवघ्या तीन दिवसांत 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे' या चित्रपटाने बरेच विक्रम आपल्या नावे केले आहेत. हा भारतातील 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. भारतातील कोणत्याही हॉलिवूड चित्रपटासाठी ही आतापर्यंतची सर्वांत मोठी 'ओपनिंग डे' कमाई (प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी) आहे. तब्बल 5000 हून अधिक स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या चित्रपटासाठी इतक्या विक्रमी संख्येने शोज लावण्यात आले.

'स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे' हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सर्व भाषांमध्ये चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळतोय. नॉर्थ अमेरिकेत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 168 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. कोणत्याही हॉलिवूड चित्रपटासाठी हा सर्वाधिक कमाईचा आकडा आहे.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असलेल्या 'स्पायडर मॅन- ब्रँड न्यू डे' या चित्रपटात टॉम हॉलंडने स्पायडर मॅन उर्प पीटर पार्करची भूमिका साकारली आहे. तर झेंडाया एमजेच्या भूमिकेत आहे. डेस्टिन डॅनिय क्रेटनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.