
सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची सगळीकडे चर्चा आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतात आयपीएलला सुरुवात होणार आहे. याच स्पर्धेआधी क्रिकेट वैभव सूर्यवंशीने मैदानावर धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा दमदार फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत चांगलीच कमाल केली आहे. त्याने अवघ्या 14 धावांत अर्धशतक केलं आहे. वैभवचा हा परतलेला फॉर्म आयपीएलमधील टीम राजस्थान रॉयल्ससाठी खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

वैभव सूर्यवंशी डीवाय पाटील ब्लू या संघाकडून क्रिकेट खेळताना दिसला. त्याने इंडियन नेव्ही या संघाच्या विरोधात दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 19 चेंडूंमध्ये 331.58 स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. त्याने आपल्या फलंदाजीदरम्यान 7 चौकार आणि 5 षटकार लगावले.

वैभवने अगोदरच्या 12 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. त्यानंतर चौकार आणि षटकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या याच खेळाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. वैभव सूर्यवंशी यावेळी राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळताना दिसेल.

वैभव सूर्यवंशीने अशी वादळी खेळी पहिल्यांदाच खेळलेली आहे, असे नाही. 2025 सालच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूंमध्ये शतक केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे भलभले अवाक झाले होते. त्याने हे शतक झळकावले तेव्हा त्याचे वय अवघे 14 वर्षे आणि 32 दिवस एवढे होते.