2020 मध्ये बाबांचं निधन झालं, मात्र आई अजूनही त्या बंगल्यात… वर्षा उसगावकर यांनी सांगितला किस्सा
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांविषयी चाहत्यांना सांगतच असतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, घटनांचा उलगडा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांची आई आणि गोव्यातील किनाऱ्याजवळील त्यांच्या घराबाबत सांगितले.

गोव्यात जन्मलेल्या वर्षा उसगांवकर यांनी कॉमर्स या शाखेत पदवी घेतली, नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर यासाठी खास दोन वर्षे नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत आल्या आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आईबद्दल आणि आवडीनिवडींबद्दल सांगितले. त्यांच्या आईंना फळे, झाडे यांची फार आवड असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, माझे बाबा आता हयात नाहीत, त्यांचं २०२० मध्ये निधन झालं... मात्र माझी आई अजूनही आमच्या सागर किनाऱ्याजवळच्या बंगल्यात राहते. तिथे छान गच्ची आहे. ती ते घर सजवून ठेवते, तिला ते आवडते.
आईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ती अजूनही फिट आहे. ती सगळं स्वतः करायची, त्यातील सर्वात आवडतं म्हणजे तिला जेवण बनवायला आणि सर्वांना मेजवानी द्यायला खूप आवडतं.
एकदा मी काही अभिनेत्रींना, क्रांती रेडकर, रेशम टिपणीस, सर्वांना घरी आमंत्रण दिलं होतं. त्या सागर किनाऱ्याजवळच्या घरी सगळ्यांना तिथे खूप आवडलं होतं. आईने छान बांगडा, सुरमई, कालवं, प्रॉन्स असे छान पदार्थ केले होते.