
भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर एक मोठी आणि आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिल्याचे वृत्त आहे.

विराट कोहली निवृत्त होणार या बातमीने भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर विराट कोहलीने खरोखरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर भारतीय कसोटी संघातील महत्वाचे आणि मधल्या फळीत खेळणाऱ्या ४ क्रमांकाचे स्थान रिक्त होईल.

विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघासाठी आधारस्तंभ राहिला आहे.

यानंतर आता विराट कोहलीच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शर्यतीत अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.

त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे श्रेयस अय्यर. तो सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये ३६.८६ च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत.

श्रेयस अय्यरने जानेवारी २०२४ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. जर विराट कोहलीने निवृत्ती घेतली तर त्याला पुन्हा कसोटी संघात संधी मिळू शकते.

याशिवाय, युवा फलंदाज देवदत्त पडिकल आणि सरफराज खान हे देखील दावेदार असल्याचे बोललं जात आहे.

देवदत्त पडिकलने आतापर्यंत तीन कसोटी डावांमध्ये ३० च्या सरासरीने ९० धावा केल्या आहेत, तर सरफराज खानने ६ कसोटी सामन्यांमध्ये ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत.

सरफराजची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी खूप चांगली आहे, जी ६५.६१ इतकी आहे. मात्र, इंग्लंडमधील खेळपट्ट्या आणि तेथील स्विंग गोलंदाजीचा सामना करणे सरफराजसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते, असे मत काही क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विराट कोहलीच्या निवृत्तीच्या बातमीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआय यावर अधिकृत प्रतिक्रिया कधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.