द्राक्षांचा एक घड 7 लाखांचा, खरबूज 22 लाखांचं; कुठे पिकतात ही महागडी फळं?
काही फळं त्यांच्या चवीसाठी किंवा सुगंधासाठी नव्हे, तर त्यांच्या अत्यंत महागड्या किमतीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जपानमधील होक्काइडो येथे पिकणाऱ्या तब्बल 22 लाख रुपयांच्या युबारी किंग खरबुजापासून ते सुमारे 7 लाख रुपयांच्या रुबी रोमन द्राक्षांपर्यंत.. जाणून घ्या जगातील 10 सर्वात महागडी आणि दुर्मिळ फळं, त्यांचं वैशिष्ट्यं आणि किंमत..

काही फळं ही त्यांची अप्रतिम चव, रंग किंवा सुगंधापेक्षा त्यांच्या असाधारण आणि आश्चर्यकारक किमतीसाठी अधिक ओळखली जातात. चला, जाणून घेऊया जगातील 10 सर्वात महागड्या फळांबद्दल.. ज्यांच्या किमती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
होक्काइडो मेलन (जपान) - या फळाला ‘युबारी किंग मेलन’ म्हणूनही ओळखले जातं. त्याची अंदाजे किंमत 25,000 डॉलर म्हणजेच सुमारे 22 लाख रुपये असू शकते. जपानमधील होक्काइडोच्या विशिष्ट वातावरणात याची लागवड केली जाते. त्याची चव अतिशय गोड, सुगंध मनमोहक आणि गर रसाळ असतो. जपानमध्ये श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांकडून हे प्रतिष्ठित भेटवस्तू म्हणून दिलं जातं.
रुबी रोमन द्राक्षं (जपान) - रुबी रोमन द्राक्षांची गणना जगातील सर्वात महागड्या द्राक्षांमध्ये केली जाते. एका घडाची किंमत सुमारे 8400 डॉलर म्हणजेच 7 लाख रुपयांपेक्षा अधिक असू शकते. या द्राक्षांचा आकार मोठा, रंग गडद लाल आणि चव अतिशय गोड असते. ही द्राक्षे सामान्य बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत, तर विशेष लिलावाद्वारे विकली जातात.
डेन्सुके कलिंगड (जपान) - काळ्या रंगाच्या सालीसाठी प्रसिद्ध असलेले हे दुर्मिळ कलिंगड सुमारे 6000 डॉलरपर्यंत विकलं जाऊ शकतं. याची लागवडही जपानमधील होक्काइडो भागात केली जाते. त्याची चव सामान्य कलिंगडाच्या तुलनेत अधिक गोड आणि सुगंधी असल्याचे मानले जाते.
बिजेम ड्युरियन (थायलंड) - ड्युरियन हे फळ संपूर्ण आग्नेय आशियात प्रसिद्ध आहे. मात्र, त्यातील ‘बिजेम’ ही जात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. या फळाचा गर लोण्यासारखा मऊ आणि सुगंधी असतो. त्याची किंमत 2500 डॉलरपर्यंत पोहोचू शकते.
हेलिगन गार्डन अननस (इंग्लंड) - इंग्लंडमधील ‘लॉस्ट गार्डन्स ऑफ हेलिगन’ येथे पिकवले जाणारे हे विशेष अननस सुमारे 1500 डॉलरला विकले जाते. हे अननस पारंपरिक आणि अत्यंत गुंतागुंतीच्या पद्धतीने पिकवले जाते. त्यामुळे त्याची चव आणि सुगंध वेगळा असल्याचे सांगितले जाते.
हामि मेलन (चीन) - चीनमधील शिनजियांग प्रदेशात पिकणाऱ्या या विशेष प्रकारच्या खरबुजाची किंमत 200 ते 300 डॉलर इतकी असू शकते. हे फळ अतिशय गोड, रसाळ आणि कुरकुरीत असते. चीनमध्ये हे विशेष प्रसंगी भेटवस्तू म्हणूनही दिले जाते.
ताइयो नो तामागो आंबा (जपान) - जपानमधील हा विशेष आंबा पिकल्यानंतर लाल-नारंगी रंगाचा होतो. त्याचा आकार अंड्यासारखा असल्याने त्याला ‘ताइयो नो तामागो’ अर्थात ‘सूर्याचे अंडे’ (Egg of the Sun) असं म्हटलं जातं. त्याची किंमत प्रति आंबा 100 ते 200 डॉलरपर्यंत असू शकते.
सिट्रस डेकोपॉन (जपान) - हे संत्रीवर्गातील एक विशेष फळ आहे. त्याची किंमत 80 ते 100 डॉलरपर्यंत असू शकते. या फळामध्ये बिया नसतात आणि त्याची चव सामान्य संत्र्यापेक्षा अधिक गोड व सुगंधी असल्याचे सांगितले जाते.
सेकाई-इची सफरचंद (जपान) - या फळाच्या नावाचा अर्थच ‘जगातील सर्वोत्तम’ असा होतो. एका सफरचंदाची किंमत सुमारे 21 डॉलर असू शकते. या सफरचंदांची विशेष काळजी घेऊन लागवड केली जाते आणि प्रत्येक सफरचंदाला हाताने पॉलिश केलं जातं.
फुयु पर्सिमन (जपान) - जपानमध्ये लोकप्रिय असलेल्या या फळाची किंमत प्रति नग 10 ते 20 डॉलर इतकी असू शकते. हे फळ चवीला गोड आणि सुगंधी असते. विशेष देखरेखीखाली त्याची लागवड केली जाते. डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे.)