विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवारांसाठी मनापासून काम करतील? अजित पवार यांचं महत्त्वाचं उत्तर

| Updated on: Apr 24, 2024 | 6:23 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी मनमोकळेपणाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील सुनेत्रा पवारांसाठी मनापासून काम करतील? अजित पवार यांचं महत्त्वाचं उत्तर
अजित पवार यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली
Follow us on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने भूमिका मांडली. विशेष म्हणजे शिवसेना नेते विजय शिवतारे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे एकेकाळी अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जायचे. पण आता युती धर्म पाळण्यासाठी हे सर्व नेते एकत्र आले आहेत. विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार या विजयी व्हाव्यात यासाठी काम करत आहेत. पण ते कितपत काम करतील, याबाबत शंका नाही का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली.

“महायुती झालेली आहे. महायुतीक भाजप, शिवेसना आहे. महाविकास आघाडीतही शिवसेना सारखा पक्ष येतोच ना. शिवसेनेला कट्टर जातीयवादी पक्ष बोलत म्हणत होते ना? सगळेच म्हणायचे की, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार बनू शकत नाही. पण बनवलं, चालवलं. तशा पद्धतीने शिवसेना चालते, तर मग भाजप का नको? तुम्ही 2014 ला भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही मीडियाला सांगितलं होतं की, आमचा बाहेरुन पाठिंबा आहे. आता काय सांगितलं जातं? आम्ही सांगितलं तरी ती निवडणुकीची त्यावेळची स्ट्रॅटेजी होती. इतरांनी केली तर स्ट्रॅटेजी आणि आम्ही केलं की मात्रे वेगळं. असं चालत नाही”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

‘मी विश्वासावर राजकारण करतो’

“उद्या महायुतीमध्ये हर्षवर्धन पाटील आहेत. राहुल कुल आहे. शिवतारे शिवसेनेचे असल्याने आहे. पण शिवसेनेचे घटक आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे सहकाऱ्यांची १०० टक्के गॅरंटी असतेच असं नाही. शेवटी विश्वास टाकावा लागतो. जग विश्वासावर चालतं. राजकारणही विश्वासावर चालतं. मी विश्वासावर राजकारण करतो. मी शब्दाचा पक्का आहे. आम्ही एकमेकांच्याविरोधात लढलो तर ताकदीने लढलो. आता एकत्र काम करायचं ठरलं तर मनापासून करतो आहे. ताकदीने करत आहोत”, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीच्या लढतीवर अजित पवारांचं महत्त्वाचं भाष्य

“राज्यात, देशात कोणतीही निवडणूक म्हटल्यावर त्यात दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतात. कधी तिरंगी लढत होत असते. बारामतीत सरळसरळ फाईट आहे. ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. अनेक विधानसभा आणि लोकसभा आम्ही लढवल्या आहेत. गेली ३५ वर्ष निवडणूक लढवत आहोत. मी स्वत एक लोकसभा आणि ७ विधानसभा लढवल्या आहेत. मला प्रचंड मताधिक्याने विजयी केलं, ही निवडणूक माझ्या दृष्टीने मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“देश पातळीवर आम्ही महायुतीने घेतली आहे. देशाचं नेतृत्व मोदींनी खंबीरपणे सांभाळलं. त्यांनी देशाची प्रगती केली. सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं देशातील जनतेचं म्हणणं आहे. त्यांना पंतप्रधान करायचं असेल तर त्यांच्या विचाराचे खासदार निवडून जाणं महत्त्वाचं आहे.
आम्ही महायुती केली आहे. शिवसेना, भाजप आणि आम्ही लढत आहोत. एक जागा मित्र पक्षाला दिली आहे. रासपचे महादेव जानकर यांना दिलं आहे. अशी बारामतीची निवडणूक आहे. मीडियाने या निवडणुकीला महत्त्व दिलं आहे. देशात आणि राज्यातील निवडणुका होतात तशीच बारामतीची निवडणूक आहे”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.