अमित शाहांकडून विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना ‘टार्गेट’

| Updated on: Jun 09, 2019 | 9:04 PM

देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली. यात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रासाठी टार्गेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाहांकडून विधानसभेसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट
Follow us on

नवी दिल्ली: देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आता नव्या मिशनला सुरुवात केली. यावर्षी देशातील 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली. यात महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांना टार्गेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शाह यांनी आज सकाळी 10 वाजता हरियाणाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची, तर दुपारी 3 वाजता झारखंडच्या नेत्यांची बैठक घेतली. यानंतर सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत शाह यांनी येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीतील अँटी इनकंबन्सी, सरकारचे कामकाज आणि भाजपची कामगिरी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. अमित शाह यांच्याशी बैठक होण्याआधी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सदन येथे भाजप कोर कमिटीची बैठक घेतली होती. यात आगामी 3 महिन्यांचा कार्यक्रमही ठरवण्यात आला होता.

बैठकीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर विस्तृत चर्चा झाली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थित विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यात आली. तसेच निवडणुकीचा रोड मॅपही तयार झाला आहे. राज्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा निर्णय झाला आहे.”

शाह यांनी महाराष्ट्रात भाजप लढवत असलेल्या जागांसह मित्रपक्षांच्या जागेवरही कार्यकर्त्यांनी मेहनत करावी अशा सुचना केल्याचीही माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेसाठी विजयाचे निश्चित लक्ष्य (टार्गेट) दिले आहे. ते लक्ष पूर्ण करण्याच्या दिशेने काम करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.