महिलांसाठी गृहलक्ष्मी-सखी योजना, मोफत वीज आणि बरंच काही; काँग्रेसकडून कर्नाटकच्या जनतेवर आश्वसनांचा पाऊस

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसकडून कर्नाटकच्या जनतेवर आश्वसनांचा पाऊस; राहुल गांधी यांनी काय-काय आश्वासनं दिली? वाचा सविस्तर...

महिलांसाठी गृहलक्ष्मी-सखी योजना, मोफत वीज आणि बरंच काही; काँग्रेसकडून कर्नाटकच्या जनतेवर आश्वसनांचा पाऊस
| Edited By: | Updated on: May 06, 2023 | 5:32 PM

बेळगाव : कर्नाटकात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाकडून कर्नाटकच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला जातोय. आज बेळगावमध्ये राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी कर्नाटकच्या जनतेला आश्वस्त केलंय. आम्ही आमची आश्वासनं पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करून दाखवू, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. भाजपने तुमचे पैसे लुटले. आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत देऊ, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला आहे.

कर्नाटकच्या जनतेला काँग्रेसचं आश्वासन

हजारो करोड रुपये जनतेला आणि शेतकऱ्यांना परत देऊ. गृहलक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला दोन हजार रुपये देऊ. सखी योजनेतून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत प्रवास घडवून आणू . अन्नभाग्य योजनेतून 10 किलो तांदूळ प्रत्येक कुटुंबाला देणार. गृहज्योती योजनेतून 200 युनिट वीज प्रत्येक कुटुंबाला मोफत देऊ. युवा निधी योजनेतून 3 हजार रुपये दर महिन्याला पदविधारकांना देणार. डिप्लोमासाठी 1500 रुपये दर महिन्याला 2 वर्षासाठी देणार. दर वर्षी अडीच लाख अश्या 10 लाख नोकऱ्या देणार, असा शब्द राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेला दिला आहे.

राहुल गांधी यांचं सरकारवर टीकास्त्र

काही दिवसात मतदान होणार आहे. तुम्हाला नवीन सरकार बनवायचं आहे. तीन वर्षा पूर्वी इथं सरकार आलं ते भाजपने चोरलं. पैसे देऊन आमदार पळवले. देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कोणतं असेल तर ते कर्नाटकमधील सरकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. चोरी करून आलेलं सरकार चोरीच करणार. कर्नाटकमध्ये प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींवर घणाघात

पंतप्रधान येतात. भाषण करतात मात्र भ्रष्टाचाराबद्दल चकार शब्दही काढत नाहीत. गेल्या तीन वर्षात कर्नाटकात जो भ्रष्टाचार झाला त्यावेळी तुम्ही काय केलं? किती जणांवर कारवाई झाली? किती जणांना जेलमध्ये टाकलं? मोदीजी महागाई, बेरोजगारीबद्दल तुम्ही काय केलं ते सांगा, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय.