ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हात असण्याची शक्यता, रामदास आठवले यांचा आरोप
दुष्काळग्रस्त तालुक्यांना तातडीने मदत देण्याची मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

पाचशे कोटींच्या आरोपाची ऑडिओ क्लिप मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या मार्फत प्रसारित केल्यानंतर महायुतीत जुंपली आहे. दुसरीकडे आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणात महाविकास आघाडीवरच ही ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याचा संशय व्यक्त केला आहे. महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी ५०० कोटींच्या आरोपाचे षडयंत्र रचल्याचा आरोपही रामदास आठवले यांनी केला आहे.
महायुती सरकारला बदनाम करण्यासाठी ५०० कोटींच्या आरोपाचे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी दिल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समन्वयाने काम करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जरांगे वारंवार आंदोलन करीतच आहेत, त्यामुळे आंदोलन संपवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप निराधार आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांचे आंदोलन संपवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप निराधार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं, सारथीसारख्या योजनांसाठी सरकारने पैसे दिले आहे. ऑडिओच्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हात असण्याची शक्यता देखील केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखविली आहे.
मतदार यादी स्वच्छ करण्यासाठीच SIR प्रक्रिया राबवण्यात आली असल्याचे देखील केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहेत. मतदार यादीतून वगळलेल्यांमध्ये मृत आणि स्थलांतरित मतदारांचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, हीच आमची भूमिका असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे तपासून मतदानाचा हक्क द्यावा असेही आठवले यांनी म्हटले आहे.
ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार नाहीत असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आणि तरुणांनी राजकीय आंदोलनात पडू नये अशीही मागणी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
