Vinayak Mete | मेटेंच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण

| Updated on: Aug 22, 2022 | 1:28 PM

येत्या बुधवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यातील सर्व आमदारांच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण ठेवण्यात आलंय. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल

Vinayak Mete | मेटेंच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आमदारांच्या वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व आमदारांच्या (Maharashtra MLA) वाहन चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी वाहन चालकांना मुंबई येथे हे प्रशिक्षण (Special Training) देण्यात येईल. जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा अपघात घडण्याची शक्यता कमी होईल. 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर विनायक मेटे यांचा अपघात झाला. मात्र हा अपघात होता की घातपास, असा संशय व्यक्त केला जातोय. मेटे यांच्या ड्रायव्हरकडून लोकेशन सांगण्यात गोंधळ झाल्यामुळे अपघात स्थळी पोलीस लवकर पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात दिली. दरम्यान, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

बुधवारी मुंबईत प्रशिक्षण

येत्या बुधवारी म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यातील सर्व आमदारांच्या चालकांसाठी विशेष प्रशिक्षण ठेवण्यात आलंय. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा असा अपघाती मृत्यू होणं ही गंभीर बाब असून अशा घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मेटे यांच्या मृत्यूनंतर जोर धरतेय. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचाही अशाच अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे भविष्यात असे प्रकार टाळण्याची खबरदारी घेतली जात आहे.

हे सुद्धा वाचा

112 नंबरवर लोकशन कळणार

विनायक मेटे यांच्या चालकाने अपघात झाल्यानंतर 112 नंबरवर कॉल केला. मात्र त्याने लोकेशन चुकीचे सांगितले. त्यामुळे यापुढे 112 नंबरवर कॉल केल्यानंतर लोकेशन दिसणार आहे, त्याबाबतची कार्यवाही करू, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. जेणेकरून मदतीसाठी कुणी फोन करताच लोकेशनच्या आधारे पोलिसांना अपघाताचं स्थळ कळलं पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण केली जाईल, असेही ते म्हणाले.

मेटेंच्या ड्रायव्हरची चुकी काय?

आज विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेटे यांच्या ड्रायव्हरने 112 नंबरला फोन केला होता. हा फोन नवी मुंबई पोलिसांना वर्ग करण्यात आला. चालकाने अपघाताचे योग्य ठिकाण सांगितले नाही. त्यामुळे घटनास्थळाचा शोध घेण्यात पोलिसांचा बराच वेळ गेला. काही काळानंतर आयआरबीचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पण यापुढे अशी घटना टाळण्यासाठी चालकांना योग्य प्रशिक्षण दिलं जाईल, असं फडणवीस म्हणाले.