बातमी फक्त खुर्चीची, सामान्य कार्यकर्त्यांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची, अवघा महाराष्ट्र कामाला!

| Updated on: Oct 05, 2022 | 12:37 PM

आजच्या मेळाव्यातील खुर्च्यांचं गणित शिवसेनेचं भाग्य बदलणारं ठरू शकतं. एक विशेष खुर्ची, तसेच 51, 31 खुर्च्या यासह नाही तर हजारो, लाखो खुर्च्यांचा आजचा प्रभाव महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा घडणवारं ठरेल.

बातमी फक्त खुर्चीची, सामान्य कार्यकर्त्यांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची, अवघा महाराष्ट्र कामाला!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः महाराष्ट्रातल्या सत्तेची (Maharashtra politics) खुर्ची, मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवण्यासाठी आज अवघा महाराष्ट्राला कामाला लागलाय. राजकीय नेत्याची सभा आणि खचाखच भरलेला सभा मंडप, हे नेत्याला जोखणारं खरं समीकरण आहे. आज याच सामान्य कार्यकर्त्यासाठी लाखो खुर्च्या वाट पाहतायत. सर्वत्र फक्त खुर्च्यांचीच चर्चा आहे. शिवसेनेचे दोन मेळावे. मुंबईतल्या बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) मेळावा होतोय. तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा. दोन्ही ठिकाणी गर्दी करण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक (Shivsainik) निघालेत. प्रत्येकाच्या नावाची खुर्ची राखून ठेवण्यात आलीय. मेळाव्यात येऊन आपली खुर्ची भरलेली दिसावी, यासाठी आज सामान्य शिवसैनिकाला एवढा मान दिला जातोय. त्याच्या जाण्या-येण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जातेय. आजच्या मेळाव्यात अजून बऱ्याच खुर्च्यांची चर्चा होतेय… वाचा…

  •  बीकेसी ग्राउंडवर एकनाथ शिंदेंचा मेळावा होतोय. येथे 2 लाख खुर्च्या ठेवण्यात आल्याचा दावा शिंदे गटातर्फे करण्यात आलाय.
  •  तर उद्धव ठाकरेंनी कोर्टात लढून मिळवलेल्या शिवाजी पार्कवर 50 ते 60 हजार खुर्च्या ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय.
  •  एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात मंचावर बंडखोर आमदारांसाठी 51 खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. तर उद्धव ठाकरेच्या मंचावर 31 खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत.
  •  सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या मेळाव्यात मंचावर स्व. बाळासाहेब ठाकरेंचं आसन रिक्त ठेवण्यात येणार आहे.
  •  एकनाथ शिंदे या खुर्चीला चाफ्यांचा हार घालून मेळाव्याची सुरुवात करतील, असं सांगण्यात येतंय.
  •  एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची रिकामी ठेवण्याची ही युक्ती उद्धव ठाकरेंच्या यापूर्वीच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातून घेतल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे.

  •  शिवसेना खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असल्याने उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यात राऊतांची खुर्ची रिकामी ठेवली होती. सर्वत्र या खुर्चीची जोरदार चर्चा होती.
  • याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेना कुणाची हा लढा आता निवडणूक आयोगाकडे गेलाय. संख्याबळ कुणाचं जास्त यावरून शिवसेना कुणाची ठरेल आणि आपसूकच शिवसेना प्रमुखांची खुर्ची कुणाकडे जाईल हेही ठरेल. त्यामुळे आजच्या मेळाव्यातील खुर्च्यांचं गणित शिवसेनेचं भाग्य बदलणारं ठरू शकतं.