सलग तीन विजय मिळवणाऱ्या नेत्यालाही धक्का बसण्याची वेळ? चिंतन करण्याचा विषय, राष्ट्रवादी नेत्याचं सूचक ट्विट

NCP Maharashtra News: अजितदादांच्या राष्ट्रवादीत संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याने स्वकीयांनाच इशारा दिला आहे.

सलग तीन विजय मिळवणाऱ्या नेत्यालाही धक्का बसण्याची वेळ? चिंतन करण्याचा विषय, राष्ट्रवादी नेत्याचं सूचक ट्विट
NCP
| Updated on: Oct 28, 2026 | 11:29 PM

महाराष्ट्र शिक्षक-पदवीधर मतदारसघांच्या पाच जागांचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अमरावती शिक्षक मतदारसंघ जिंकला आहे. येथे किरण सरनाईक यशस्वी ठरले आहेत. नागपूर ग्रॅज्युएट मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. तेथे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहले पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा शरद पवार गटाने जिंकली आहे. यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने एक सूचक ट्विट केले आहे.

शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव देशमुख यांनी पुणे पदवीधर जागा जिंकली आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी पुणे शिक्षक जागा जिंकली. शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक यांनी अमरावती शिक्षक जागा जिंकली. तर नागपूर पदवीधर जागा काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी जिंकली आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर जागेवर शरद गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. या सगळ्यावर प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केले आहे.

Loading...

ते म्हणाले की, आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सलीम सारंग म्हणाले की, अजित दादा हयात असताना ज्या निवडणूका झाल्या तेव्हा त्या विजयाचा ‘मास्टर ब्लास्टर हे फक्त अजित दादा असायचे. कारण दादांच्या संघटनात्मक बांधणी आणि ठाम नेतृत्वावर लोकांचा विश्वास असायचा. मी गेल्या वेळेस बोललो होतो. एकट्या दादांचं नाव घेऊन स्वतःची राजकीय कारकीर्द किती दिवस चालवायची? आता वेळ आली आहे दादांनी आपल्याला जे दिलं, त्यापेक्षा जास्त परत देण्याची.

ते म्हणाले की, आजघडीला महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुका केवळ उमेदवारांची लोकप्रियता तपासत नाहीत, तर पक्षाची संघटनात्मक ताकद, नेतृत्वाची विश्वासार्हता आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळही अधोरेखित करतात. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील सलग तीन वेळा विजय मिळवणाऱ्या नेत्याला राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची परिस्थिती निर्माण होत असेल. खरंच चिंतन करण्याचा विषय आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षांसाठी सामाजिक न्याय, सर्वसमावेशकता आणि सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणे ही केवळ भाषणापुरती मर्यादित बाब नसते. ती प्रत्यक्ष संघटनात्मक निर्णयांतूनही दिसली पाहिजे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, पक्षाची विचारधारा आणि प्रत्यक्ष राजकीय रणनीती यांच्यात अंतर वाढत आहे का?, असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणे आणि विविध समाजघटकांना संघटनेत योग्य स्थान देणे, हे आज पक्षासमोरील मोठे आव्हान आहे. चमचेगिरीने पदे मिळू शकतात, पण जनाधार निर्माण होत नाही. पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान, अनुभवी नेतृत्वाला संधी आणि चुकीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी लागेल. अन्यथा प्रत्येक निवडणुकीनंतर आत्मपरीक्षणाच्या चर्चाच होत राहतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us