Devendra Fadnavis : मेट्रो कारशेड आरेतच होणार, देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

| Updated on: Jul 01, 2022 | 6:54 PM

उद्धव ठाकरेंचा पूर्ण आदर ठेवून इतकंच सांगतो की त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे मी त्यांना वारंवार सांगितलं होतं. त्यांना विनंती केली होती की तुमचा ईगो तुम्ही बाजूला ठेवा आणि कारशेड आरेतच होऊ द्या, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis : मेट्रो कारशेड आरेतच होणार, देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट, उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : 25 टक्के काम झालेल्या ठिकाणीच कारशेड होणार, असल्याचं उपमुख्यमंत्री (Deputy CM) देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. माजी मुख्यमंत्री ( former CM) उद्धव ठाकरे यांच्या टीकेला ते उत्तर देत होते. कार शेडच्या संदर्भात आम्ही आता योग्य तो निर्णय घेऊ. कारशेडच्या संदर्भात मुंबईकरांचं हित हेच आहे की, जिथं कारशेड 25 टक्के तयार झालं, तिथंच ते शंभर टक्के तयार व्हावं, असंही फडणवीस म्हणाले. त्यांनी सांगितलं की, मेट्रो तीनचे (Metro Three) भरपूर काम झाले आहे. पण कारशेडचं काम होत नाही तोवर ही मेट्रो सुरु होऊ शकत नाही. मागच्या सरकारच्या कारशेडसाठी जी जागा निवडली ती वादात आहे. ती जागा मिळाल्यानंतरही तिथे चार वर्षे कारशेड होऊ शकत नाही.

कारशेड आरेतच होऊ द्या

आमच्या सरकारच्या वेळी आरेतील जी जागा सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. तिथे 25 टक्के काम पूर्ण झालं आहे आणि राहिलेलं 75 टक्के काम लवकर केलं जाऊ शकतं. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरु करायची असेल तर कारशेड आरेतच बनलं पाहिजे. त्यासाठी आमचा आरेतच कारशेड बनवण्याचा निर्णय असेल. उद्धव ठाकरेंचा पूर्ण आदर ठेवून इतकंच सांगतो की त्यांचा निर्णय चुकीचा आहे हे मी त्यांना वारंवार सांगितलं होतं. त्यांना विनंती केली होती की तुमचा ईगो तुम्ही बाजूला ठेवा आणि कारशेड आरेतच होऊ द्या, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

ठाकरे म्हणाले, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका

मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गाचा दिलेला पर्याय योग्य आहे. त्याचा विचार करा. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं. दरम्यान, कारशेड आरेमध्ये होऊ नये, यासाठी हजारो पर्यावरण प्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकार विरोधात आंदोलन केलं होतं. फडणवीस सरकारनं पोलिसी बळाचा वापर केला. रात्री झाडं कापण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं. त्यांनी आरेमध्ये कारशेड न करण्याचा निर्णय घेतला. कार शेड कांजूर मार्ग येथील शेकडो एकर जागेचा विचार झाला होता. पण, केंद्रानं त्यात हस्तक्षेप केला.

हे सुद्धा वाचा