राणेंना 20 वर्ष फासा पलटवता आला नाही, फडणवीसांनाही ते जमणार नाही, हे सरकार 25 वर्ष टिकेल : नवाब मलिक

| Updated on: Feb 08, 2021 | 4:04 PM

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतराबाबत केलेल्या सूचक वक्तव्यावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली (Nawab Malik answer to Devendra Fadnavis)

राणेंना 20 वर्ष फासा पलटवता आला नाही, फडणवीसांनाही ते जमणार नाही, हे सरकार 25 वर्ष टिकेल : नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
Follow us on

मुंबई : “भाजप खासदार नारायण राणे यांनी 20 वर्ष फासे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनाही फासे पलटवणं जमणार नाही. महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल”, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यासह देशातील घडामोडींवर भूमिका मांडली (Nawab Malik answer to Devendra Fadnavis).

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं म्हणत फडणवीसांनी राज्यात सत्तांतराचे संकेत दिले होते. त्यांच्या या दाव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं (Nawab Malik answer to Devendra Fadnavis).

रोहित पवारांचंही उत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतराचे संकेत देण्याबाबतच वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं पहिल्या दिवसापासून म्हणणाऱ्या लोकांना हे सरकार अजूनही चालत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगतात. आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावेत”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

“राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल”, असं फडणवीस म्हणाले होते.

संबंधित बातमी : देवेंद्र फडणवीस म्हणाले, फासा आम्हीच पलटणार, आता रोहित पवारांचं उत्तर