मेट्रो कारशेडसाठी नवाब मलिक यांनी सुचवली पर्यायी जागा

| Updated on: Dec 01, 2019 | 12:43 PM

'आरे'च्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी सुचवला

मेट्रो कारशेडसाठी नवाब मलिक यांनी सुचवली पर्यायी जागा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत ‘मुंबई मेट्रो’साठी आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मेट्रो कारशेडसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवा पर्याय सुचवला आहे. ‘आरे’च्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी (Metro Car shed Optional place) मांडली.

यापुढे एकाही झाडाचे पान आता तोडले जाणार नाही. आमचा विरोध मेट्रोला नाही, तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती.

विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई मेट्रोबाबत गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप केला. आरेच्या बाजूलाच असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर कारशेड होऊ शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारशेडसाठी 30 हेक्टर जागेची गरज आहे. एसआरपीएफ कँम्पमध्ये 41 हेक्टर जागा असून मुख्यमंत्र्यांनी या जागेचा विचार करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी आज सभागृहात केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली होती. भाजपचे इतर नेतेही मुंबईच्या विकासाला यामुळे खिळ बसेल, अशी टीका करत होते. मात्र आमदार नवाब मलिक यांनी नवा पर्याय सुचवत मार्ग काढला आहे.

मुंबई मेट्रो हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मेट्रोचे कारशेड आरेमध्ये प्रस्तावित केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. पर्यावरणप्रेमींनी उग्र आंदोलने केली. मात्र सरकारने ही आंदोलने चिरडून टाकली. त्यानंतर एका रात्रीत सरकारने प्रस्तावित जागेवर आवश्यक असणारी सर्व झाडे कापून टाकली होती.

रात्रीच्या अंधारात झाडे कापल्यामुळे एकच जनक्षोभ उसळला होता. त्यावेळी सत्ता आल्यानंतर आरेला जंगल म्हणून घोषित करु, अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती. मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बसल्यानंतर ते आरेबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी कारशेडच्या (Metro Car shed Optional place) कामाला स्थगिती दिली.

आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु होणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.