शरद पवारांनी बोलावली 45 कुस्ती संघटनांची बैठक; पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन

| Updated on: Jun 03, 2023 | 11:34 AM

Sharad Pawar Maharashtra State Kustigir Parishad Meeting : भारतीय कुस्ती महासंघाचा आक्षेप, पण न्यायालय म्हणत हीच खरी कुस्तीगीर परिषद!; शरद पवारांनी बोलावली बैठक, मोठं शक्ती प्रदर्शन

शरद पवारांनी बोलावली 45 कुस्ती संघटनांची बैठक; पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन
Follow us on

पुणे : पुण्यात कुस्तीगीर परिषदेची महत्त्वाची बैठक होत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची पुण्यात बैठक होत आहे. बैठकीला राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी सलग्नित 45 संघाच्या प्रतिनिधींना या बैठकीचं निमंत्रण आहे. पुण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरीवरून मोठा वाद झाला होता. हाच वाद आता चिघळण्याची शक्यता आहे.

बैठकीत या वादावर काय चर्चा होतेय. याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या या वादात आता शरद पवार यांनी लक्ष घातलं आहे. बाळासाहेब लांडगे गटाने याचिका केली होती. याच गटाची शरद पवारांनी बैठक बोलवली आहे. बाळासाहेब लांडगे आणि रामदास तडस यांच्यातील वाद चिघळणार असल्याची चिन्हे आहेत.

पुण्यातील वारजेत ही महाराष्ट्र कुस्ती परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा होतेय. शरद पवार यांच्या उपस्थितीतील या बैठकीनंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील 45 कुस्ती संघाचे अध्यक्ष उपस्थित आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद आणख चिघळण्याची शक्यता आहे. कारण शरद पवारांनी या वादात सक्रिय भुमिका घ्यायच ठरवलंय. शरद पवारांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ असे मिळून 45 संघांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलय.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय बृजभुषण सिंग अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला.त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली. या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन देखील करण्यात आलं. मात्र बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आवाहन दिलं.

न्यायालयाने बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीला स्थगिती दिलीय. त्यामुळे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार गटाकडून राज्यातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघांना बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. वादाच्या पार्श्वभूमीवर पुढे कोणती भुमिका घ्यायची हे या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. दुसरीकडे बाळासाहेब लांडगे गटाने आयोजित केलेल्या स्पर्धांमधे सहभागी होणाऱ्या जिल्हा कुस्ती संघांवर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघाने मागे दिला होता. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने आजच्या बैठकीत राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

नेमका वाद काय आहे?

भारतीय कुस्तीमहासंघानं 30 जून 2022 ला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. यावेळी शरद पवार या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. तर बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस होते. तेव्हा बाळासाहेब लांडगे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायलयाने बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने निर्णय दिला. आज या संदर्भात पवारांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.