मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं
महायुतीमधील पक्षांमध्ये सुप्तसंघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादीच्या एका नेत्याची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता महायुतीमध्येच सुप्तसंघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गट-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक, भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक अनंता पावशे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीनंतर आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा नेताही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एका कार्यक्रमात भाजपचं कौतुक केल्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाची पुन्हा चर्चा रंगली आहे.
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक सलीम सारंग यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी भाजप आणि मुस्लिम समाजाबाबत भाष्य केलं. तर भाजपमधील नेत्यांवरही त्यांनी मत मांडलं. भाजपच्या काही नेत्यांकडून मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. परंतु 65 वर्षात देशात कोणाची सत्ता होती? भाजपला सत्तेत येऊन अवघी 15 वर्षे झाली आहेत, अशा शब्दात सलीम सारंग यांची भाजपची बाजू मांडली.
एसआयआर सर्व्हेच्या मुद्द्यावरही सारंग यांनी भाष्य केलं. आमच्या पूर्वजांचं या मातीत रक्त सांडलं आहे. देश स्वातंत्र्य झाल्यावर आमच्याकडे कुठे जायचं, याबाबत पर्याय होता. परंतु आम्ही भारतात राहणं पसंत केलं. भाजप सत्तेत आल्यावर कागदपत्रांच्या मुद्द्यांवरून एकाही मुस्लिम नागरिकाला देशाच्या बाहेर काढलं नाही. खरंतर सर्वांची कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली, असा दावा सारंग यांनी केला. मुस्लिमांच्या पाठिंब्यामुळे भाजप तयार झाला, असेही ते म्हणाले. दिवगंत अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लिम समाजासाठी काम केलं, अशीही आठवण सारंग यांनी सांगितली. सत्ताधाऱ्यांकडून मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण मिळावं, यासाठी दहा लाख रुपयांच्या अनुदानाची सुरुवात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादांची उणीव भासत असून त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वत:च्या राजकीय भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने भाजपच्या बाजूने भाष्य केल्याने चर्चांना उधाण आलं. त्यामुळे सलीम सारंग हे भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलं आहे.
भाजपच्या माजी नगरसेविकेचा शिंदे गटात प्रवेश
कल्याण-डोंबिवलीत महायुतीच संघर्ष पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाने पलटवार केल्याचे आहे. कल्याणमध्ये आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजपचे माजी नगरसेवक अनंता पावशे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने आनंद दिघे यांच्या आश्रमात पावशे यांचा पक्षप्रवेश झाला. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पावशे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील नव्या राजकीय समीकरणांवर परिणामाची चर्चा सुरू झाली आहे.
