सुषमा अंधारे यांचा 18 वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ परतला, शॉकिंग,अनपेक्षित,भावनिक गुंता! भाऊ-बहीण काय म्हणाले?

जाधव यांच्या कुटुंबात 18 वर्षांनी परतलेले युवराज यांनीही यावेळी गोंधळलेल्या स्थितीत प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे यांचा 18 वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ परतला, शॉकिंग,अनपेक्षित,भावनिक गुंता! भाऊ-बहीण काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 17, 2023 | 4:22 PM

महेंद्र जोंधळे, लातूरः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत फायर ब्रँड अशी ओळख मिळावलेल्या नेत्या म्हणजे सुषमा अंधारे (Sushma Andhare). ठाकरे गटाच्या नेत्या, शिंदे-भाजप सरकारवर सणकून टीका करणाऱ्या नेत्या अशी ख्याती मिळवलेल्या सुषमा अंधारे यांचे बॅनर्स जागोजागी झळकत आहेत. याच बड्या बड्या बॅनर्समुळे सुषमा अंधारे यांच्या कौटुंबिक आयुष्यातही मोठी घटना घडली आहे. सुषमा अंधारे यांचे हे बॅनर्स पाहून त्यांच्या घरातून निघून गेलेला भाऊ तब्बल 18 वर्षांनी परतला आहे. ताईंचे हे फोटो पाहूनच माझे पाय पुन्हा घरी येण्यासाठी वळले, अशी प्रतिक्रिया अंधारे यांच्या भावाने दिली.

लातूरमध्ये सुषमा अंधारे यांच्या घरी त्यांची आणि भावाची ही भेट घडून आली. 18 वर्षांनी परतलेल्या भावाचं औक्षण सुषमा अंधारे यांनी केलं. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

चित्रपट पाहून निघून गेला होता…

युवराज जाधव असं सुषमा अंधारे यांच्या भावाचं नाव आहे. 18 वर्षांपूर्वी वास्तव चित्रपट पाहिल्यानंतर काहीतरी करून दाखवायचं म्हणून ते बाहेर पडले. त्यानंतर कधीच घरी परतले नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांचा वाढता राजकीय प्रभाव पाहता, त्यांनी पुन्हा एकदा घरी परतण्याचा निर्णय घेतला.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

सगळे आनंदात आहे. आमच्यासाठी शॉकिंग, अनपेक्षित आणि अविश्वसनीय आहे. युवराजसाठीदेखील हे सगळं पचवणं अवघड आहे. संमिश्र भावना आहेत. आम्ही सगळे भावनिक पातळीवर गोंधळलेलो आहोत. पण काहीही असो. 18 वर्षांनी आमचं वाट बघणं संपलंय. आमचा भाऊ आमच्या सोबत आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

भाऊ युवराज म्हणाले…

जाधव यांच्या कुटुंबात 18 वर्षांनी परतलेले युवराज यांनीही यावेळी गोंधळलेल्या स्थितीत प्रतिक्रिया दिली. ताईमुळेच मी पुन्हा एकदा घराकडे वळालो, आज आणखी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया युवराज जाधव यांनी दिली.