बिहारमध्ये जो शब्द दिला तो पाळला, महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेला शब्दच दिला नव्हता : भाजप

| Updated on: Nov 16, 2020 | 1:32 PM

भाजपने नितीश कुमारांना दिलेला शब्द पाळला. मात्र महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

बिहारमध्ये जो शब्द दिला तो पाळला, महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेला शब्दच दिला नव्हता : भाजप
Follow us on

मुंबई :बिहारमध्ये भाजपने आधीच जाहीर केलं होतं, त्यानुसार जेडीयू नेते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. भाजपने दिलेला शब्द पाळला. मात्र महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता”, असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (We promised Nitish Kumar, not to Shiv sena, said Pravin Darekar )

बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप- संयुक्त जनता दलाने (BJP JDU) आज मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचं (Oath taking ceremony) आयोजन केलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून दोघांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दरेकरांनी आपलं मत व्यक्त केलं.

बिहारमध्ये कमी जागा येऊनही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रिपद दिलं आहे. मात्र इथे भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदं स्वत:कडे घेतली आहेत. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, “भाजपने दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. त्यातही महिलांचे प्रश्न समजून घेऊन निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्री देण्यात आल्या आहेत”

महाराष्ट्रात शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती, मात्र भाजपने याबाबतचा शब्द कधीच शिवसेनेला दिला नव्हता, असंही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. बिहारमध्ये आधीच नितीश कुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ठरले होते, त्यानुसार भाजपने शब्द पाळला, असं दरेकरांनी अधोरेखित केलं.

भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी

बिहारमध्ये भाजपनं चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांहून अधिक काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी दोन उपमुख्यमंत्रिपदे घेतली आहेत. भाजपने तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन उपमुपख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्यास रेणू देवी यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजपने रविवारी तारकिशोर प्रसाद यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. रेणूदेवी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुशीलकुमार मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

नितीश कुमारांचा शपथविधी

बिहारमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजप- संयुक्त जनता दलाने (BJP JDU) आज मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचं (Oath taking ceremony) आयोजन केलं आहे. नितीश कुमार यांचा शपथविधी संध्याकाळी 4.30 वाजता राजभवनात होणार आहे. या सोहळ्याला दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. मात्र बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे नेते तेजस्वी यादव यांनी शपथविधीचं निमंत्रण स्वीकारलेलं नाही.

(We promised Nitish Kumar, not to Shiv sena, said Pravin Darekar )

संबंधित बातम्या 

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस  

Nitish Kumar Oath : देवेंद्र फडणवीस शपथविधीला हजर राहणार, तेजस्वींनी निमंत्रण नाकारलं