50 लाखांचं पॅकेज सोडलं, एका झटक्यात मोठा निर्णय, अक्षिता होणार साध्वी

आयआयएममधून एमबीए करून 50 लाखांचे पॅकेज मिळवणारी अक्षिता जैन आता जैन साध्वी बनणार आहे. कॉर्पोरेट जीवनातील अध्यात्मिक ओढ आणि अहिंसेच्या विचारांनी प्रेरित होऊन तिने संन्यास स्वीकारला. तिची आई शिरोमणी बजाज यांनीही इंडियन ऑईलची नोकरी सोडून यापूर्वीच साध्वी दीक्षा घेतली आहे.

50 लाखांचं पॅकेज सोडलं, एका झटक्यात मोठा निर्णय, अक्षिता होणार साध्वी
akshita jain
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 11:40 AM

आयआयएममधून एमबीए करायचं आणि मोठ्या कंपनीत नोकरी करायची हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण 37 वर्षीय अक्षिता जैनने हे यश संपादन केल्यानंतरही वेगळाच मार्ग निवडला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केल्यानंतर आणि फिएट, मर्सिडिज-बेंज आणि फॉक्सवॅगन सारख्या मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर अक्षिताने आपल्या करिअरला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षिताने जैन साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे. तिची आई शिरोमणी बजाज ही सुद्धा साध्वी आहे. तिची आई इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये चीफ मॅनेजर पदावरून निवृत्त झालेली आहे.

अक्षिताला फॉक्सवॅगनमध्ये 50 लाख रुपयांचं पॅकेज होतं. या पॅकेजवर तिने पाणी सोडलं आहे. कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असतानाच तिच्या मनात अध्यात्मिक विचार रुजू लागले. कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित काम करतानाच तिचा आध्यात्मिकतेकडे ओढा वाढला होता. डेटा सेंटर बनवल्यावर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होणार? याचा ती विचार करू लागली. डेटा सेंटर बनवण्यासाठी जमिनीचे खोदकाम आणि मातीतील सुक्ष्म जीवांना होणारा संभाव्य धोका यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला. तिच्या मनात जैन धर्मातील अहिंसा सिद्धांताचे गांभीर्य वाढले. त्यामुळे तिने चिंतन मनन सुरू केलं आणि हळूहळू ती आध्यात्माकडे ओढली गेली. त्यातूनच तिने संन्यास मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

आईही बनली संन्यासी

अक्षिताच्या आधी तिची आई शिरोमणी बजाज यांनी संन्यास पत्करला आहे. 61 वर्षाच्या शिरामणी या इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये 37 वर्ष कार्यरत होत्या. त्या कंपनीच्या चीफ मॅनेजर पदावरून ऑक्टोबर 2025मध्ये निवृत्त झाल्या. नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी संन्यासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. नवऱ्याच्या निधनानंतर त्यांनी कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडल्या. या काळात त्यांचा आध्यात्माकडे अधिक कल वाढला होता. जैन साध्वींच्या संपर्कात आल्यावर त्यांची धार्मिक रुची अधिक वाढली. त्यानंतर त्यांनी संसाराचा त्याग करून दीक्षा घेतली. आता त्यांच्याच मार्गावर त्यांची कन्या अक्षिताही साध्वी होत आहे. लाखो रुपयांचं पॅकेज सोडून आणि सर्व भौतिक सुखाचा त्याग करून अक्षिता या संन्यास मार्गावर जात आहेत.

25 फेब्रुवारी रोजी दीक्षा समारंभ

अक्षिता आणि शिरोमणी या दोघीही जैन आध्यात्मिक गुरू साध्वी पूर्णप्रज्ञाश्री यांच्या सानिध्यात आहेत. दीक्षेपूर्वी दोघीही धार्मिक तयारीत व्यस्त होत्या. शिरोमणी यांनी संन्यासाच्या तयारीचा भाग म्हणून अनेक धार्मिक अनुष्ठान आणि कठिण तप पूर्ण केले आहेत. दीक्षेच्या आधी जैन परंपरेनुसार अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने राजस्थानच्या जोधपूर येथे पारंपारिक वरघोडा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी चेन्नईत दीक्षा समारंभ होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us