
Navratri fasting Rules : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू झाले असून आज तिसरी माळ आहे. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण आराधना करतात, काहींचा तर या काळात उपास असतो, व्रतही असते. दुर्गेची पूजा-अर्चना करून, तिला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण कठोर साधना करतात, जप करतात आणि त्यासोबत काही जण जोड देतात ती उपवासाची. परंतु उपवासाचे काही नियम असतात, काही खबरदारी घ्यावी लागते, त्याचे पालन करणे आवश्यक असते, अन्यथा उपवास मोडू शकतो. अलिकडेच, प्रेमानंद महाराजांचा या विषयावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते नवरात्रीचे व्रत करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे सांगताना दिसत आहेत.
दुसऱ्यांच्या घरी खाणे-पिणे टाळावे ?
प्रेमानंद महाराजांच्या सांगण्यानुसार, जे लोक नवरात्रीचे व्रत करतात, त्यांनी पहिली आणि सर्वात महत्त्वाची खबरदारी घ्यावी की उपवासाच्या दिवशी त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जेवायला जाऊ नये, पाणी पिणे तर दूरच राहिलं. ते स्पष्टपणे सांगतात की असे केल्याने उपवास मोडतो. प्रेमानंद महाराजांनी असाही सल्ला दिला की, शक्य असल्यास, उपवासाच्या काळात कोणाच्याही घरी जाणे टाळावे.
अन्न आणि सात्त्विकतेकडे द्या विशेष लक्ष
प्रेमानंद महाराजांनी नवरात्रीच्या उपवासाच्या काळात खाण्यापिण्याबाबत कडक नियम घालून दिले आहेत. ते म्हणतात की नवरात्रीच्या काळात भक्तांनी कांदा तसेच लसूण खाणे पूर्णपणे टाळावे. याव्यतिरिक्त, शारदीय नवरात्रीमध्ये सात्विक जीवन जगले पाहिजे. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजे.
नवरात्रीत हे नियम पाळा !
प्रेमानंद महाराजांच्या सांगण्यानुसार, उपवासाच्या दिवसांत, व्यक्तीने ब्रह्मचर्य काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि घरी राहून देवाच्या नावाच जप केला पाहिजे.
तसेच या उपवासाच्या काळात, इतरांबद्दल वाईट बोलणे किंवा टीका करणे टाळावे. अशा गोष्टी केल्याने उपवास मोडू शकतो आणि उपवासाचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.
हे नियम आवश्यक का ?
प्रेमानंद महाराजांच्या सांगण्यानुसार, नवरात्र हा केवळ उपवास आणि संयमाचा सण नाही तर आध्यात्मिक साधना आणि आत्मसंयमाचा काळ आहे. जर भक्तांनी विहित नियमांचे पालन करून देवी दुर्गेची पूजा केली तर त्यांना निश्चितच तिचा आशीर्वाद मिळेल. परंतु निष्काळजीपणा केला किंवा अयोग्य वर्तन केलं तर त्यामुळे उपवास मोडतो आणि त्याचे फायदे अपूर्ण राहतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)