एकमेव फूल जे कधीच तोडून शिवलिंगावर अर्पण करू नये, कोणतं आहे ते फूल?
एकमेव फूल जे कधीच तोडून शिवलिंगावर अर्पण केलं जात नाही. हे फूल खाली पडलेले असेल तर ते उचलून शिवलिंगावर अर्पण केलं जातं. तुम्हाला माहिती आहे का?

पारिजातक किंवा हरसिंगाराचं फूल सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. पांढऱ्या पाकळ्या आणि केशरी देठ असलेल्या या फुलाचा सुगंध मन प्रसन्न करणारा असतो. धार्मिक मान्यतेनुसार पूजा-अर्चेतही या फुलाला विशेष महत्त्व आहे.
पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनातून पारिजातक वृक्षाची उत्पत्ती झाली. त्यामुळे त्याला ‘देववृक्ष’ असंही म्हटलं जातं. हरिवंश पुराणात पारिजाताकचा उल्लेख असून, हे फूल मनोकामना पूर्ण करणारे असल्याची धार्मिक मान्यता आहे. या झाडाची आणखी एक खासियत म्हणजे त्याची फुलं रात्री उमलतात आणि सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर आपोआप जमिनीवर गळून पडतात.
शिवलिंगावर पारिजातक अर्पण करताना ‘हा’ नियम महत्त्वाचा
धार्मिक परंपरेनुसार पारिजाताकचं फूल शिवलिंगावर अर्पण करताना ते झाडावरून तोडू नये. रात्री उमलून सकाळी नैसर्गिकरित्या जमिनीवर पडलेली स्वच्छ फुलंच पूजेसाठी वापरावीत, अशी मान्यता आहे. त्यामुळे इतर फुलांप्रमाणे पारिजाताकची फुलं झाडावरून तोडून शिवलिंगावर अर्पण केली जात नाहीत.
तसंच, जमिनीवर पडलेलं फूल पाण्याने धुण्याचीही गरज नसल्याचं धार्मिक मान्यतांमध्ये सांगितलं जातं. मात्र फूल स्वच्छ, ताजं आणि चांगल्या अवस्थेत आहे याची खात्री करून ते श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करावं.
श्रीकृष्णाशीही पारिजाताकचा संबंध
पारिजाताकचा संबंध केवळ भगवान शिवांच्या पूजेशी नाही, तर भगवान श्रीकृष्णाशीही जोडला जातो. पौराणिक कथांनुसार, श्रीकृष्णाने हा दिव्य वृक्ष स्वर्गातून पृथ्वीवर आणला होता. त्यामुळे भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांच्या पूजेतही पारिजाताकला विशेष स्थान असल्याचं मानलं जातं.
घरात पारिजाताकचं झाड लावणं शुभ?
धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतेनुसार, घराच्या अंगणात किंवा बागेत पारिजाताकचं झाड असणं शुभ मानलं जातं. रात्री उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधामुळे परिसर प्रसन्न होतो. तसेच पारिजाताकच्या पानांचा आणि सालीचा पारंपरिक पद्धतीने औषधी उपयोगही केला जातो. मात्र आरोग्याशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती पौराणिक कथा, धार्मिक श्रद्धा आणि प्रचलित परंपरांवर आधारित आहे. यातील मान्यता वैज्ञानिक तथ्य म्हणून घेऊ नयेत.
