Video : भारत को छोड़ना नहीं..चाहत्याची हारिस रौफकडे मागणी; Video व्हायरल

Asia Cup 2025 : पाकिस्तानने बांगलादेशला हरवून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत आता त्यांचा टीम इंडियाशी सामना होणार आहे. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका चाहत्याने पाकिस्तानी खेळाडूकडे केलेली मागणी आणि वक्तव्य चर्चेत आली आहे.

Video : भारत को छोड़ना नहीं..चाहत्याची हारिस रौफकडे मागणी; Video व्हायरल
पाकिस्तानी चाहत्याची हारिस रौफकडे मागणी काय ?
| Updated on: Sep 26, 2025 | 12:25 PM

IND vs PAK : आशिया कप स्पर्धेत फायनल सामन्यात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 28 सप्टेंबरला, रविवारी दुबईतील मैदानात फायनल रंगणार असून विजेतेपदासाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत भारताने दोन वेळा पाकिस्तानला हरवलं असून टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. तर आता फायनलमध्ये हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा समोरासमोर येणार आहेत. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी चाहता हा पाकिस्तानी संघातील खेळाडू हारिस रौफशी हात मिळवताना दिसत आहे, मात्र त्याचं बोलणं जास्त चर्चेत आहे, ‘भारत को छोड़ना नहीं…’ (भारताला सोडू नको) असं तो ओरडताना दिसतोय.

काय आहे तो व्हिडीओ ?

आशिया कपच्या सुपर-4 मधील एका महत्त्वाच्या सामन्यात काल पाकिस्तानने बांगलादेशचा 11 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने चाहत्यांशी हस्तांदोलन केले. त्याचदरम्यान, एका चाहत्याने हरिस रौफचा हात धरला आणि तो ओरडला, “भारताला सोडू नको, भारताला सोडू नको, व्याजासकट बदला घ्या” असं तो वारंवार म्हणताना दिसतोय.

 

त्याचं हे बोलणं ऐकून हरिस रौफ हसला आणि चाहत्याच्या बोलण्यावर सहमती दर्शवताना दिसला, त्याने होकार दिला. यावेळी चाहता खूपच उत्साही दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. मात्र, भारताविरुद्ध पाकिस्तानची कामगिरी पाहता, हे अशक्य दिसतंय.

हॅटट्रिक करत पाकिस्तानला धूळ चारण्यास टीम इंडिया उत्सुक

आशिया कपव 2025 या स्पर्धेत पाकिस्तानला टीम इंडियाकडून दोन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता, तर गेल्या रविवारी झालेल्या सुपर फोरमध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवत पाकला पराभूत केलं. आता भारतीय संघ, पाकिस्तानविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्यास उत्सुक आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये बराच वादही झाला आहे.

गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन केले नाही, तर हरिस रौफच्या 6-0 आणि लढाऊ विमानांच्या हावभावांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच, पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानच्या गन सेलिब्रेशनने वाद आणखीनच वाढवला. त्यातच आता, पाकिस्तानी चाहत्याच्या या कृतीने, मागणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.