1..2..3..ते 18! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया बांग्लादेश कसोटी सामन्यात धडाधड विकेट, 51 वर्षात तिसऱ्यांदा असं घडलं
AUS vs BAN 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामा होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी दाणादाण उडवून दिली. पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळून 18 विकेट पडल्या.

AUS vs BAN 2nd Test, DAY-1: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना ड्रॉ किंवा बांगलादेशने जिंकला मालिका गमवण्याची नामुष्की ओढावणार आहे. असं असताना दुसर्या कसोटी सामन्यात गोलंदाजांचा कहर दिसला. पहिल्याच दिवशी धडाधड 18 विकेट पडल्या. प्रथम फलंदाजीसाठी आलेला बांगलादेशचा संघ अवघ्या 64 धावांवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तसंच प्रत्युत्तर दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 165 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आक्रमक बाणा
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मग काय पहिल्या चेंडूपासून बांगलादेशवर दबाव वाढवला. शदमान इस्लाम पहिल्याच चेंडूवर चालता झाला. मिचेल स्टार्कने या डावात वर्चस्व गाजवलं. त्याने 10 षटकात 6 निर्धाव षटकं टाकत 12 धावा देत 6 गडी तंबूत पाठवले. तर पॅट कमिन्सने 3 आणि जोश हेझलवूडच्या खात्यात 1 विकेट आली. यासह बांगलादेशचा डाव अवघ्या 64 धावांवर आटोपला. बांगलादेशच्या चार फलंदाजांना खातंही खोलता आलं नाही. तर तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. फलंदाजांमध्ये शोरिफुल इस्लामने सर्वाधिक 14 धावांची खेळी केली.
बांगलादेशच्या शरीफुल इस्लामची भेदक गोलंदाजी
बांगलादेशचा संघ 64 धावांवर बाद झाल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शरीफुल इस्लामने ऑस्ट्रेलिया फलंदाजांना दणका दिला. अवघ्या 11 षटकात 35 धावा देत 6 गडी बाद केले. ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर तस्कीन अहमद मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. त्यामुळे पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 165 धावांवर 8 विकेट तंबूत होते.
51 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
मॅके कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 74 षटकांचा खेळ पार पडला. दोन्ही संघांनी मिळून 229 धावा केल्या आणि 18 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियन भूमीवर मागच्या 51 वर्षात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी धडाधड इतक्या विकेट पडण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी फक्त दोनदा एकाच दिवशी 18हून अधिक विकेट पडल्याचा प्रकार घडला होता.