AFG vs CAN : अफगाणिस्तानचा विजयासह शेवट, कॅनडाचा 82 धावांनी धुव्वा

Afghanistan vs Canada Match Result : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने राशीद खान याच्या नेतृत्वात कॅनडाला पराभूत करुन वर्ल्ड कप मोहिमेतील दुसरा विजय मिळवला. अफगाणिस्तानने कॅनडावर एकतर्फी फरकाने विजय मिळवला.

AFG vs CAN : अफगाणिस्तानचा विजयासह शेवट, कॅनडाचा 82 धावांनी धुव्वा
Afghanistan Cricket Team
Image Credit source: afghanistan cricket X Account
| Updated on: Feb 19, 2026 | 11:15 PM

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने केला आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेतील 39 व्या सामन्यात कॅनडाचा 82 धावांनी धुव्वा उडवला. अफगणिस्तानने कॅनडासमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र कॅनडाला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 118 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानाने यासह हा सामना आपल्या नावावर केला. अफगाणिस्तानचा हा या मोहिमेतील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. तर कॅनडाला रिकाम्या हाती मायदेशी परतावं लागलं आहे. कॅनडाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही.

इब्राहीम झाद्रान याने केलेल्या नाबाद 95 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने द्विशतक झळकावलं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. कॅनडाकडून 201 धावांचा पाठलाग करताना फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅनडासाठी हर्ष ठाकेर याने सर्वाधिक धावा केल्या. हर्षने 24 चेंडूत 30 धावा केल्या. साद बीन झफर याने 28 धावांचं योगदान दिलं. ओपनर युवराज सामरा याने 17 रन्स केल्या. तर कॅप्टन दीलप्रीत बाजवा याने 13 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त कॅनडाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. अफगाणिस्तानसाठी अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. नबीने कॅनडाच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. राशीद खान याने 2 विकेट्स मिळवल्या. तर मुजीब उर रहमान आणि अझमतुल्लाह ओमरझई या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

अफगाणिस्तानचं द्विशतक

त्याआधी कॅनडाने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. अफगाणिस्तानने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. अफगाणिस्तानची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 200 धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच अफगाणिस्तानची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच इब्राहीम झाद्रान अफगाणिस्तानसाठी टी20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. इब्राहीमने 95 धावांच्या या खेळीत 5 सिक्स आणि 7 फोर लगावले. त्या व्यतिरिक्त सेदीकुल्लाह अटल याने 44 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरुबाज याने 30 धावांचं योगदान दिलं. कॅनडासाठी जसकरण सिंह याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

अफगाणिस्तानचा सलग दुसरा विजय

इब्राहीम झद्रान मॅन ऑफ द मॅच

दरम्यान इब्राहीम झद्रान याला त्याने केलेल्या 95 धावांच्या विक्रमी खेळीसाठी मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इब्राहीम ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरला.