IND vs PAK : टीम इंडियाकडून हरल्यानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी

IND vs PAK : वनडे वर्ल्ड़ कप 2023 आधी पाकिस्तानसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची हवाच काढून टाकली. एकप्रकारने पाकिस्तानचा हा लाजिरवाणा पराभव ठरला.

IND vs PAK : टीम इंडियाकडून हरल्यानंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी
pakistan cricket team
| Updated on: Sep 13, 2023 | 8:40 AM

कोलंबो : टीम इंडियाने सोमवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. आशिया कप 2023 च्या सुपर 4 राऊंडमध्ये दोन्ही टीम आमने-सामने आल्या होत्या. टीम इंडियाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. पाकिस्तानला अजिबात संधी दिली नाही. टीम इंडियाने या मॅचमध्ये 50 ओव्हर्समध्ये फक्त 2 विकेट गमावून 356 धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानची टीम अवघ्या 128 धावांवर ऑलआऊट झाली. भारताने हा सामना 228 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची हवाच काढून टाकली. एकप्रकारने पाकिस्तानचा हा लाजिरवाणा पराभव ठरला. या नामुष्कीनंतर पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. पाकिस्तानचे दोन प्रमुख गोलंदाज आशिया कप 2023 च्या उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

हॅरिस रौफ आणि नसीम शाह हे पाकिस्तानचे दोन गोलंदाज दुखापतीचा सामना करतायत. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवेळी त्यांना दुखापत झाली. हॅरिस आणि नसीम हे पाकिस्तानी गोलंदाजीचा आधारस्तंभ आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध आहे. कदाचित हे दोघे या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत. गुरुवारी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना होणार आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, या मॅचला हे दोन्ही खेळाडू मुकू शकतात. पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचली, तरी या दोघांच्या खेळण्याबद्दल अनिश्चिचतता कायम आहे. आशिया कप 2023 मध्ये हॅरिस रौफ सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 29 वर्षाच्या रौफला रविवारी उजव्या बगलेत त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा खेळला नाही.



नसीम शाहने कधी मैदान सोडलं

नसीम शाह सुद्धा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. टीम इंडियाची बॅटिंग सुरु असताना 49 व्या ओव्हरमध्ये नसीम शाहने मैदान सोडलं. खांदा दुखत असल्याने तो मैदानाबाहेर गेला. हे दोन्ही प्लेयर फलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरू शकले नाहीत. टीम इंडियाने या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. खबरदारी म्हणून नसीम आणि हॅरिसला फलंदाजीसाठी पाठवलं नाही, असं काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तान टीम मॅनेजमेंटला वर्ल्ड कप 2023 आधी कुठलाही धोका पत्करायचा नाहीय.