आरसीबीविरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशीने गाठला 340 धावांचा पल्ला, या व्यक्तीला दिलं यशाचं श्रेय

RCB vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात कोलकात्याकडून अंगकृष रघुवंशी याची बॅट चांगलीच तळपली. त्याने 46 चेंडूत 71 धावा केल्या आणि एक मोठा टप्पा गाठला.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशीने गाठला 340 धावांचा पल्ला, या व्यक्तीला दिलं यशाचं श्रेय
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशीने गाठला 340 धावांचा पल्ला, या व्यक्तीला दिलं यशाचं श्रेय
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 13, 2026 | 11:10 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत 57व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा आरसीबीच्या बाजूने लागला. आरसीबीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि कोलकात्याला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात अंगकृष रघुवंशीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंगकृष रघुवंशीने 46 चेडूत 71 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे कोलकात्याने 20 षटकात 4 गडी गमवून 192 धावा केल्या. केकेआरने फिन एलेन आणि कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट झटपट गमावली होती. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. पण त्यातून अंगकृष रघुवंशीने बाहेर काढलं. त्याला कॅमरून ग्रीन आणि रिंकु सिंह यांची साथ मिळाली. हा सामना केकेआरसाठी करो या मरो असा आहे.

अंगकृष रघुवंशी 300 पार

आयपीएल 2026 स्पर्धेत अंगकृष रघुवंशीने चौथ्यांदा अर्धशतकी खेळी केली. यासह आयपीएल 2026 स्पर्धेत 300 धावांचा पल्ला गाठणारा कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला फलंदाज ठरला. त्याने या पर्वातील 11 डावात 340 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 140 पेक्षा कमी आहे. पण त्याने कठीण परिस्थितीत संघाचा बाजू सावरली हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अंगकृष रघुवंशीने मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि दोन वेळेस सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. आरसीबीविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर रघुवंशीने त्याचं श्रेयस अभिषेक नायर यांना दिलं. नायर संघाचे प्रशिक्षक असून त्यांच्यामुळेच या संघात खेळत असल्याचं सांगितलं.

अंगकृषने अर्धशतकी खेळी केल्यानंतर सांगितलं की, ‘रायपूर खेळपट्टीवर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे की मोठे फटके मारणं कठीण आहे. आजच्या डावासाठी अभिषेक नायर यांना श्रेय देईन. अभिषेक सर मला केकेआरमध्ये घेऊन आले. त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. मी आजची खेळी नायर सरांना समर्पित करतो.’ अंगकृषची फलंदाजी पाहून सुनील गावस्करही त्याचे चाहते झाले आहेत. त्यांनी समालोचन करताना त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या तंत्राचं कौतुक केलं.

Follow Us