बिंग पुन्हा फुटलं! ट्रेव्हिस हेडचा फ्लॉप शो सुरूच, सलग सहाव्या डावात अशा पद्धतीने झाला बोल्ड
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ट्रेव्हिस हेड फ्लॉप गेला. अवघ्या 4 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्रॅड इव्हान्सने त्याला त्रिफळाचीत केलं.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज ट्रेव्हिस हेड याच्या खराब फॉर्मची आणि बाद होण्याच्या एकाच पद्धतीची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ट्रेव्हिस हेड अवघ्या 4 धावांवर स्वस्तात बाद झाला. मात्र, तो बाद झाला त्यापेक्षा ज्या पद्धतीने बाद झाला, त्याने ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाची आणि फलंदाजी प्रशिक्षकांची चिंता प्रचंड वाढवली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सने हेडला जाळ्यात अडकवले. व्हान्सने ऑफ स्टंपच्या बऱ्यापैकी बाहेर टाकलेल्या चेंडूवर हेडने शरीरापासून दूर जाऊन स्क्वेअर कट मारण्याचा चुकीचा प्रयत्न केला. पायांची कोणतीही हालचाल न करता मारलेल्या या फटक्यामुळे चेंडू त्याच्या बॅटची आतली कडा घेऊन थेट स्टंप्सवर आदळला आणि त्याचा त्रिफळा उडाला.
ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू अन् दांडी गुल
व्यावसायिक क्रिकेटमध्ये ट्रेव्हिस हेड सलग सहाव्या डावात त्रिफळाचीत होऊन बाद झाला आहे. हा प्रकार आता निव्वळ योगायोग राहिलेला नसून गोलंदाजांनी त्याची सर्वात मोठी कमजोरी शोधून काढल्याचे सिद्ध झाले आहे. आयपीएल, त्यानंतर बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका आणि आता झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका अशा तिन्ही ठिकाणी तो सलग सहा डावांत बोल्ड झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, तर सलग चार डावांमध्ये हेड चेंडू स्वतःच्याच स्टंपवर ओढून बाद झाला आहे. शरीरापासून दूर खेळण्याची प्रवृत्ती आणि पायांच्या हालचालींचा अभाव यामुळे गोलंदाज सातत्याने त्याला पाचव्या स्टंपच्या रेषेवर चेंडू टाकून चूक करण्यास भाग पाडत आहेत.
गेल्या 23 डावांमधील आकडेवारीचे विचित्र कोडे
ट्रेव्हिस हेडच्या गेल्या 23 व्यावसायिक डावांमधील बाद होण्याच्या पद्धतीची आकडेवारी एखाद्या कोड्यासारखी वाटते. त्याच्या पहिल्या 17 डावांमध्ये तो फक्त आणि फक्त झेलबाद झाला होता. त्यानंतरच्या सलग सहा डावांमध्ये तो केवळ आणि केवळ त्रिफळाचीत झाला आहे. बाद होण्याच्या या असामान्य प्रवृत्तीमुळे आगामी महत्त्वाच्या मालिकांपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट जाणकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.