BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप

पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली. तसेच मालिका 2-0 ने जिंकत क्लिन स्विप दिला.

BAN vs PAK : बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप
BAN vs PAK : बांगलादेशने कसोटी मालिकेत दिला धोबीपछाड, सलग दुसऱ्यांदा दिला क्लिन स्विप
Image Credit source: ICC
| Updated on: May 20, 2026 | 4:49 PM

पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेतील दुसर्‍या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय अंगलट आला. कारण बांगलादेशने पहिल्या डावात 278 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 232 धावांवर गारद झाला. त्यामुळे बांगलादेशला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली. तर दुसर्‍या डावात 390 धावा केल्या आणि विजयासाठी 436 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठणं काही पाकिस्तानला जमलं नाही. पाकिस्तानचा डाव 358 धावांवार आटोपला आणि बांगलादेशने हा सामना 78 धावांनी जिंकला. या विजयासह बांगलादेशने पाकिस्तानला क्लिन स्विप दिला. दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली.

बांगलादेशकडून कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लिटन दासची खेळी लक्षणीय ठरली. त्याने 159 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकार मारत 126 धावा केल्या. तर पाकिस्तानचा डाव आला तेव्हा बांगलादेशच्या नाहिद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी भेदक गोलंदाजी केली. दोघांनी मिळून प्रत्येकी तीन विकेटसह 6 विकेट काढल्या. तर तस्किन अहमद आणि मेहिदी हसन मिराजने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात मुशफिकुर रहिमने 137 धावांची खेळी केली. त्याच्यासोबत तग धरत लिटन दासने 69 धावा केल्या. तर महमुदुल हसन जोय याने 52 धावांची खळी केली. दुसऱ्या डावात 436 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने झुंज दिली पण अपयशी ठरली. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 94 धावा केल्या. तर शान मसूद 71 धावा करून बाद झाला. तर बांगलादेशकडून एकट्या तैजुल इस्लामने 6 विकेट काढल्या. तर नाहिद राणाने 2, तस्किन अहमदने 1 आणि मेहिदी हसन मिराजने 1 विकेट काढली.

दुसऱ्या कसोटीतील पराभवावर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद म्हणाला की, ‘खूप चुका झाल्या. जेव्हा तुम्ही सामन्याच्या चौथ्या डावात 360 धावा करता, तेव्हा तुम्ही विजयाच्या बाजूने असाल अशी अपेक्षा असते. पण मला वाटतं की, आधीच्या तीन डावांमध्ये आम्हाला खूप विचार करायला हवा होता आणि अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे आम्ही सामन्यात परत आलो आणि लक्ष्य खूप मोठे वाटले.’ बांगलादेशने पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा क्लिन स्विप दिला आहे. यापूर्वी पाकिस्तानात जाऊन 2-0 पराभूत केलं होतं. आता आपल्याच देशात पाकिस्तानला 2-0 मात दिली.

Follow Us